मुंबई : जिल्हा क्रीडा परिषद, रायगड व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड आणि पोलिस मुख्यालय, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कळंबोली येथे आयोजित करण्यात आलेल्या मुंबई विभाग अंतर्गत शालेय कुस्ती स्पर्धेत मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने व मिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्यातील मल्लांनी ४ सुवर्ण व ५ कांस्य पदकांची कमाई केली. त्यांच्या ओम जाधव, मनस्वी राऊत, कोमल पटेल, डॉली गुप्ताने सुवर्ण पदक पटकावली. तर कविता राजभर, स्नेहा गुप्ता, सुप्रिया गुप्ता, शिवांश जालुई आणि आर्दश शिंदे यांनी कांस्य पदके मिळविली.
प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या पैलवानांची निवड राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेकरिता करण्यात आली आहे. पदक विजेत्यांना वस्ताद वसंतराव पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. श्री गणेश आखाड्यातर्फे सर्व पदक विजेत्यांचे खास अभिनंदन करण्यात आले तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या.
