पालघर : गुढीपाडवा शोभायात्रा मंडळ आणि संस्कार भारती, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने नववर्षानित्त ‘सूर पहाटेचे’ हा गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पालघर शहरातील माहीम रोड येथील लक्ष्मीनारायण मंदिरात गायिका वैदेही मुळीक, सूरज पाटील, रूपक आचार्य यांच्या मंत्रमुग्ध गायनाने रसिक भारावून गेले होते. दीपा चंपानेकर यांचा छत्रपती संभाजी महाराजांवरचा पोवाडा गायनाने रसिकांमध्ये हिंदुत्वाची स्फूर्ती भरून आली होती. त्यातच शिवरंजन यांच्या ढोल-ताशाच्या गजरात सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असलेली शोभायात्रा पालघर शहरात काढण्यात आली. या शोभायात्रेत अनेक प्रतिष्ठित लोकांबरोबरच खासदार राजेंद्र गावित हेही सहभागी झाले होते.
पंकज आचार्य यांची तबला साथ, तर संवादिनी अंकुश घरत, व्हायोलिन यशवंत राणे, निवेदन प्राची पावगी यांनी केले. शोभायात्रेतील तारपा नृत्यामध्ये अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. अनेक ठिकाणी मराठी संस्कृतीचे दर्शन या शोभायात्रेत घडून आले होते. नऊवारी साड्या नेसून मुलीही सहभागी झाल्या होत्या. लक्ष्मीनारायण मंदिराकडून पालघर रेल्वे स्थानकापर्यंत शोभायात्रा आयोजित केली होती. शोभायात्रेने पालघर शहर गजबजून गेले होते. पुरुष-महिलांनी भगवे फेटे परिधान केले होते. मोठ्या उत्साहात नववर्षाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
