निष्ठावंतांच्या पाठीशी उभे राहणार : कपिल पाटील
मुरबाड : भाजपा हा सर्व प्रामाणिक कार्यकर्त्यांचा पक्ष असून, मुरबाड तालुक्यातील एका व्यक्तीचा तो पक्ष नाही. अशा व्यक्तींच्या जोखडातून भाजपाला मुक्त करणार असून, पक्षाची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. भाजपाच कार्यकर्ता स्वाभिमानी आहे अन, तो स्वाभिमानी राहील, अशी ग्वाही माजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज येथे दिली. भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांबरोबरच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार असून, कोणावरही अन्याय होणार नाही, असा दिलासा कपिल पाटील यांनी दिला.
भाजपाच्या मुरबाड विधानसभा मतदारसंघातील निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मेळावा आज मुरबाड येथील माऊली हॉलमध्ये पार पडला. या मेळाव्याला मुरबाड मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संपूर्ण हॉल गच्च भरल्यानंतर हॉलचे आवार व हॉलबाहेर कार्यकर्ते उभे होते. या मेळाव्याला माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी भाजपाचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मधुकर मोहपे, ज्येष्ठ नेते रामभाऊ पातकर, तालुकाध्यक्ष जयवंत सुर्यराव, शरद म्हात्रे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुभाष घरत, माजी नगरसेवक अण्णा कुलकर्णी, रामभाऊ बांगर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा शीतल तोंडलीकर, दीपक खाटेघरे, नारायण गोंधळी आदी उपस्थित होते.
भाजपाचा कार्यकर्ता कसा मोठा होईल, याला आपण प्राधान्य दिले. पदावर नसलो, तरी भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या आपण कायम पाठीशी राहू, अशी ग्वाही कपिल पाटील यांनी देऊन भाषणाला सुरुवात केली. लोकसभेला केलेल्या कामाप्रमाणेच निष्ठावंत कार्यकर्त्यांनी विधानसभेला दुप्पट काम करू, असा विश्वास व्यक्त केला.
मुरबाड तालुक्यात विकास प्रकल्पे राबविताना शेतकऱ्यांच्या आपण कायम पाठीशी राहू. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या भाजपा कार्यकर्त्याला धमक्या दिल्या जातात. कल्याण-मुरबाड रेल्वे, शहापूर-मुरबाड रस्ता तयार करण्यावेळी शेतकऱ्यांच्या जमिनीला चांगला मोबदला मिळेल, यासाठी आपण प्रयत्न केले. यापुढील काळातही शेतकऱ्यांवरील अन्याय सहन करणार नाही, असा इशारा कपिल पाटील यांनी दिला.
कल्याण-मुरबाड रेल्वे, माळशेज घाटातील रस्त्याचे काम, शहापूर-मुरबाड रस्ता ही कामे केंद्र सरकारची आहेत. त्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न कोणीही करु नये, असा टोलाही कपिल पाटील यांनी लगावला.
00000
