मुंबई : माय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने आता मराठी भाषेचा डंका अधिक जोमाने सर्वत्र गाजणार आहे. मराठी भाषेच्या संवर्धन आणि विकासासाठी मुंबईत होत असलेले मराठी भाषा भवन उत्तम आणि दर्जेदार व्हावे, असे सांगून भाषा भवनाच्या माध्यमातून मराठी भाषा अधिक समृद्ध आणि प्रगल्भ करण्यासाठी अधिक जोमाने काम करूया, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
जवाहर बाल भवन परिसर, चर्नी रोड (प.) येथे उभारण्यात येणाऱ्या ‘मराठी भाषा भवन’चे भूमिपूजन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका विकास निधी तथा मुंबई शहर जिल्हा अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना यातून होणाऱ्या विविध विकास कामांचे भूमिपूजन / लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले.
समारंभास विधानसभा अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेकर, शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, कौशल्य, रोजगारमंत्री मंगलप्रभात लोढा, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक, मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मराठी भाषा भवनासाठी चांगली जागा उपलब्ध झाली असून भवनाचे भूमिपूजन आज सागराच्या साक्षीने होत आहे याचा आपणास आनंद होत आहे. भाषा भवनाचे काम अतिशय दर्जेदार व्हावे असे सांगून या भाषा भवनाच्या माध्यमातून मराठी भाषेच्या संवर्धन, संशोधन आणि प्रसारासाठी अधिक बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच भाषा भवनसाठी साहित्यिक व अन्य क्षेत्रातून आलेल्या सूचनांचा आदर केला जाईल, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्यात पायाभूत सुविधा निर्माण करत असताना जनकल्याणाच्या योजनेतून जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी, वयोश्री अशा योजनांच्या माध्यमातून सामान्यांना आधार मिळत आहे. जनकल्याणाच्या योजना राबवताना राज्याचा विकासही तितक्याच गतीने केला जात आहे. कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो, समृद्धी महामार्ग असे विकासाचे मोठे प्रकल्प राबवून राज्य विकासात अग्रेसर ठेवले आहे.
मराठी भाषा मंत्री श्री. केसरकर यांनी यावेळी बोलताना मराठी भाषकांना आणि साहित्यिकांना अभिमानास्पद वाटेल असे भाषा भवन उभारले जाईल, अशी ग्वाही दिली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने तिच्या वैभवात आणखी भर पडली आहे. मराठी भाषा संवर्धन आणि विकासासाठी शासनामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. मुंबईत येणाऱ्या साहित्यिकांसाठी व राहण्याची सोय व्हावी यासाठी कवी मंगेश पाडगावकर यांच्या नावाने साहित्य भवन बांधणार असल्याचे श्री. केसरकर यांनी यावेळी सांगितले. तसेच सातारा येथे विश्वकोश मंडळासाठी नवीन इमारत, प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.