मरीन लाईन्स येथील बडा कब्रस्तान येथे बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात दफनविधी करण्यात आले. यावेळी बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकींचे सांत्वन करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार, सलमान खान आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुंबई : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची बांद्रा खेरनगर येथे भर रस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या दोघांकडे २८ जिवंत काडतूसे सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. इतकी काडतुसे बाळगण्यामागे केवळ बाबा सिद्धीकी यांनाच मारायचा हेतू होता की अन्य ही कोणाला मारण्याचा हेतू होता”, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी आज या आरोपींची पोलिस कस्टडी मिळवताना न्यायालयात केला आहे.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणाबाबत धर्मराज कश्यप या आरोपीला न्यायमूर्तींनी वय विचारले असता त्याने त्याचं वय १७ असल्याचं सांगितलं आहे. अल्पवयीन आरोपी म्हणून ट्रिटमेंट मिळावी यासाठी आरोपींच्या वकिलांकडून न्यायालयात मागणी करण्यात आली आहे. आरोपींच्या वकिलांकडून देखील त्याचं वय १७ असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. नेमकं वय किती? हे तपासण्यासाठी अल्पवयीन आरोपीचं आधारकार्ड हे न्यायमूर्तींकडून मागवण्यात आलं आहे. आधारकार्डनुसार आरोपीचं वय १९ असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. आधारकार्डनुसार त्याचं वय १९ आहे, मात्र यांच्या म्हणण्यानुसार त्याचं वय १७ आहे. आरोपीच्या वकिलांकडे वया बाबत पुरावे नाहीत, असा दावाही सरकारी वकिलांनी केला आहे.
दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने न्यायालयाने आरोपी गुरुनैल सिंगला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर दुसऱ्या आरोपी असलेल्या धर्मराज कश्यप वय तपासले जाणार आहे. आरोपी अशा गुन्ह्यात अनेकदा स्वत:च्या बचावासाठी बनावट आधारकार्डही बनवतात, असंही सरकारी वकिलांनी म्हटलं आहे. त्यानंतर आरोपी वयाचा खुलासा व्हावा, यासाठी वैद्यकिय चाचणी करण्यास तयार झाले आहेत. यातील आरोपींनी पुणे आणि मुंबईत राहून बाबा सिद्दिकी यांची रेकी केली होती. या आरोपींना हत्यार कोणी दिलं, वाहन कोणी दिलं? याचा तपास होणं महत्वाचं आहे असे सरकारी वकिलांनी न्यायालयास सांगितले.