मुंबई: ज्या शिवाजीपार्कच्या मैदनावरून लाव रे तो व्हिडियोने पाच वर्षापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात जाहिर आघाडी उघडली होती त्याच मोदींना शिवाजीपार्कवरूनचं राज ठाकरे यांनी मनसे पाठींबा दिला. हा पाठींबा फक्त आणि फक्त मोदींना असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. मोदींसाठी एनडीएला महाराष्ट्र नवनिर्माण बिनशर्त पाठींबा देत आहे अशी घोषणा करून लोकसभेच्या निवडणूकीतून राज ठाकरे यांनी माघार घेतली.
प्रकाश आंबेडकरांचा वंचित, बच्चू कडूंचा प्रहार, राजू शेट्टींचा स्वाभिमानी पक्ष, महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष आदी छोटे पक्ष निवडणूकीच्या रिंगणात असताना मनसने लोकसभेच्या निवडणूकीतून सलग दुसऱ्यांदा माघार घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. लोकसभा आपण लढत नसलो तरी विधान सभा जोमाने लढणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहिर केले आणि त्यासाठी आतापासूनच कामाला लागण्याचे आवाहन त्यांना कार्यकर्त्यांना केले. महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रचार कसा करायचा यावर भाष्य करणे मात्र त्यांनी टाळले.
फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी यांच्यासाठी आपण शिवसेना आणि राष्ट्रवादी असलेल्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शवत असल्याचं राज ठाकरे यांनी आज पाडवा मेळाव्यानिमित्त शिवतीर्थवरून जाहीरपणे सांगितलं. लोकसभेची निवडणूक जाहिर होताच राज ठाकरेंनी दिल्लीत अमित शाहांची भेट घेतली होती. यामुळे राज ठाकरे खरंच महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चां सुरु झाल्या होत्या. राज ठाकरेंना लोकसभेसाठी तीन जागा मिळतील अशी अटकळ होती. पण त्या जागा भाजपाच्या चिन्हावर लढण्याची ऑफर आपण धुडकावल्याचे आज राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
“या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्त्वाची गरज आहे, ज्याच्याकडून माझ्या अपेक्षा आहेत, त्यांनी त्या पूर्ण केल्या नाहीत तर राज ठाकरेंचं तोंड आहे. पुढच्या भविष्यात मला खंबीर नेतृत्त्वाची गरज असताना मी त्यांना सांगितलं की माझी काही अपेक्षा नाही. मनसे भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना फक्त नरेंद्र मोदींसाठी यांना बिनशर्त पाठिंबा देत आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच मी अध्यक्ष राहणार. तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावर पक्ष उभा केला आहे. त्याला १८ वर्ष झाली आहेत. कुठल्या पक्षाचा प्रमुख होणार नाही आणि कुणाच्या हाताखालीही हा राज ठाकरे काम करणार नाही असे राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितले, “जागावाटपावरही चर्चा झाली. मी खरं सांगू का? मी शेवटच्या जागावाटपाच्या चर्चेला बसलो होतो ते १९९५ ला. दोन तू घे, ही मला दे.. हे मला जमणार नाही. माझ्याकडून ते होणार नाही” असंही राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे पहिला माणूस होता ज्याने म्हटलं होतं की नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत. त्यावेळी त्यांच्या पक्षातलंही कुणी याबद्दल बोललं नव्हतं. मी पाठिंबा दिला. २०१९ पर्यंत पाहिलं की ज्या गोष्टी झाल्या त्या मला पटल्या नाहीत. बुलेट ट्रेन, नोटबंदी सगळे निर्णय घेतले. ज्या गोष्टी पटल्या नाहीत त्याचा मी विरोध दर्शवला. माझा राग तर टोकाचा आहे. महाराष्ट्रावर माझं प्रेम आहे ते टोकाचं प्रेम आहे. माझा टोकाचा विरोध लाव रे तो व्हिडीओतून तुम्हाला दिसला. असंही राज ठाकरे म्हणाले.
“नरेंद्र मोदींकडून देशाला अपेक्षा आहेत. आज या जगात सर्वात तरुण देश असेल तर तो आपला भारत देश आहे. सर्वाधिक तरुण सध्या भारतात आहेत. या तरुणांना-तरुणींना चांगल्या शिक्षणाची गरज आहे. तंत्रज्ञानाची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने काम केलं पाहिजे. आणखी १० वर्षांनी हा देश वयस्कर व्हायला लागणार. माझी मोदींकडून अपेक्षा आहे की भारतातल्या तरुणांकडे लक्ष द्या. भारताचं भविष्य हेच तरुण-तरुणी आहेत. प्रत्येक देशाचा एक काळ असतो. जपानमध्ये एक काळ होता. अनेक कंपन्या तिथे उभ्या राहिल्या. अनेक व्यवसाय उभे राहिले. घुसळून निघाला तो देश, असा आपला देश घुसळून निघाला पाहिजे. तसं जर घडलं नाही तर सगळ्याच गोष्टींवरचा समाजाचा विश्वास उडून जाईल, देशात अराजक येईल” असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
