मुंबई : यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिक मधिल ब्राँझ मेडल विजेत्या स्वप्नील कुसळे आणि पॅराऑलिम्पिकममधिल सिल्व्हर मेडल विजेत्या सचिन खिलारी यांच्यासहीत आंतरराष्ट्रीय पातळीवर मेडल जिंकणाऱ्या महाराष्ट्राचा खेळाडूंचा राज्य सरकारतर्फे रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.
ऑलिम्पिक संपून दोन महिने झाले तरी या मेडल विजेत्यांच्या सत्कारासाठी सरकारला वेळ मिळत नसल्याची ओरड क्रीडा संघटनांकडून होत होती. विशेषता स्वप्निल कुसळेने तब्बल ७२ वर्षांचा ऑलिम्पिक मेडलचा महाराष्ट्राचा दृष्काळ संपविला होता. यापुर्वी १९५२च्या हेलिसिंकी ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या खाशाबा जाधव यांनी मेडल जिंकले होते. दरम्यान आज आचारसंहिता लागण्यापुर्वी अखेर पॅरिस ऑलिंम्पिक स्पर्धेमध्ये पदक प्राप्त खेळाडूंना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते धनादेश आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
पॅरिस येथे पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील नेमबाजी स्पर्धेमधील ५० मीटर रायफल ३ पोझिशन या उपप्रकारामध्ये कांस्य पदक प्राप्त करणाऱ्या स्वप्निल कुसळे व पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेतील मैदानी स्पर्धेमधील गोळाफेक या उपप्रकारामध्ये रौप्य पदक प्राप्त करणाऱ्या सचिन खिलारी या खेळाडूंचा व श्री.कुसळे यांच्या प्रशिक्षक दिपाली देशपांडे व श्री. खिलारी यांचे प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले. स्वप्निल कुसळे यास दोन कोटी रुपये तसेच त्यांच्या प्रशिक्षक दिपाली देशपांडे यांना २० लाख रुपये व पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेतील मैदानी स्पर्धेमधील रौप्य पदक प्राप्त करणाऱ्या सचिन खिलारी यास तीन कोटी रुपये तसेच त्यांचे प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांना ३० लाख रुपयांचा धनादेश व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
बुडापेस्ट, हंगेरी येथे दि. १० ते २३ सप्टेंबर, २०२४ या कालावधीत झालेल्या ४५ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या संघाने सुवर्णपदक संपादन करुन ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या संघात राज्याचे बुद्धिबळपटू विदीत गुजराथी व दिव्या देशमुख यांचा समावेश होता, या दोन्ही खेळाडूंचा राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रत्येकी एक कोटी रुपये व त्यांचे मार्गदर्शक अनुक्रमे संकल्प गुप्ता व अभिजीत कुंटे यांना प्रत्येकी १० लाख रुपये इतकी रक्कम व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. विदीत गुजराथी यांच्यावतीने त्यांचे वडील डॉ. संतोष गुजराथी यांनी तर अभिजीत कुंटे यांच्या वतीने त्यांच्या पत्नी मेघना कुंटे आणि संकल्प गुप्ता यांच्यावतीने त्यांचे वडील संदीप गुप्ता यांनी हा सन्मान स्वीकारला.
सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमास मुख्य सचिव सुजाता सौनिक, क्रीडा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, आयुक्त सुरज मांढरे आदी मान्यवर उपस्थित होते.