मुंबई : महिलांवर होणार्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी महिला आयोग काम करत असते. परंतु महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या कार्यालयाचा वापर आता राजकीय कार्यक्रमासाठी केला जात असून महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर या आयोगाच्या कार्यालयातूनच अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचे काम करत असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी केली आहे.
तसेच याप्रकरणी वेळीच योग्य ती कारवाई न झाल्यास निवडणूक आयोगाकडेही रितसर तक्रार दाखल करणार असल्याचा इशाराही संध्या सव्वालाखे यांनी दिला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी नेमकी काय कारवाई केली जाते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
राज्य महिला आयोग कार्यालयाचा गैरवापर
महिला आयोगाचे अध्यक्षपद हे संवैधानिक पद आहे. महिला आयोगाच्या कार्यालयातच आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पक्ष प्रचाराचे काम करून पदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे. पक्ष प्रचाराचे काम वरिष्ठाच्या दबावाखाली करावे लागत आहे का, हे रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले पाहिजे. तसेच चाकणकर या दडपणाखाली पक्ष प्रचाराचे काम करत असतील तर ते अयोग्य, चुकीचा पायंडा पाडणारे आणि असंवैधानिक असल्याचा आरोप काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी केली आहे. महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी जे कार्यालय आहे, त्या कार्यालयातून राजकीय प्रचाराचे काम व्हायला नको. याप्रकरणी योग्य ती कारवाई करावी अन्यथा निवडणूक आयोगाकडे या प्रकाराची रितसर तक्रार दाखल केली जाणार असल्याचा इशाराही संध्या सव्वालाखे यांनी दिला आहे.
महिलांना न्याय मिळत नसल्याचा आरोप
रूपाली चाकणकर यांच्यावर यापूर्वी देखील महिला आयोगाच्या सदस्याच संगीता चव्हाण यांनी आरोप करत, रूपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष असल्या तरी त्यांच्या दरबारात महिलांना न्याय मिळत नसल्याचा म्हणाल्या होत्या. त्यावेळी संगीता चव्हाण यांनी रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी केली होती. विशेष म्हणजे गडचिरोली मधील वन विभागात असलेल्या एका प्रकरणात संबंधित महिलेला महिला आयोगाच्या कार्यालयातून हाकलून लावण्यात आले. त्या महिलेने आतापर्यंत महिला आयोगाकडे न्याय मागण्यासाठी किती वेळा अर्ज आणि विनवणी केली, याचे पुरावे देखील संगीता चव्हाण यांनी दाखवले होते. महाविकास आघाडीचे सरकार असताना महिला आयोगाच्या माध्यमातून अनेक महिलांना न्याय मिळाला. मात्र रूपाली चाकणकर या फक्त आता आपल्या पक्षाचे काम करत असून महिलांना न्याय मिळत नसल्याचे आरोपही संगीता चव्हाण यांनी केले होते.
