सध्या देशाचा उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिकांच्या अंगाची काहिली होत आहे. देशातील बहुतांश भागात पारा ४० अंशाच्या आसपास गेला आहे. दरम्यान, या वाढत्या तापमानात लोक लिंबू सोडा, विविध प्रकारचे कोल्ड्रिंक घेत आहेत. त्यामुळे सध्या बाजारात लिंबाच्या दरात तेजी आली आहे. सहाजिकच विक्रीसाठी लिंब उपलब्ध असणार्या शेतकर्यांना मोठा फायदा होत आहे. लिंबाच्या दरात ३५० टक्कयांची वाढ झाली आहे.
यापूर्वी लिंबू सोडा २० रुपये प्रति ग्लास दराने विकला जात होता. आता लिंबू सोडा २५ ते ३० रुपये प्रति ग्लास दराने विकला जात आहे. दरम्यान, तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे पुढच्या काळात लिंबाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मध्यम आकाराच्या लिंबाला प्रति किलो शंभर रुपयांचा दर मिळत आहे. उन्हाचा चटका वाढल्याने बाजारात लिंबाची मागणी वाढत आहे. त्यामुळे दरातही वाढ होत आहे.
सध्या कर्नाटक राज्यात किरकोळसह घाऊक बाजारातही लिंबाच्या दरात वाढ झाली आहे. ही वाढ ३५० टक्कयांची आहे. दरम्यान, तापमानात अशीच वाढ होत राहिली तर लिंबे आणखी महाग होऊ शकतात. दुष्काळी परिस्थिती आणि बदलत्या हवामानाचा काही ठिकाणी लिंबाला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी लिंबाच्या बागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारपेठेत सध्या लिंबाचा म्हणावा तेवढा पुरवठा नाही. पुरवठा कमी झाल्याचा परिणाम दरांवर झाला आहे. लिंबू विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिनाभरापूर्वी एक हजार लिंबांचा दर दोन हजार रुपये होता. आता याच एक हजार लिंबाचा दर सात हजार रुपयांपेक्षा जास्त झाला आहे. त्यामुळे याचा शेतकर्यांना चांगला फायदा होतो आहे.
हवामानतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील विविध भागात तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. वाढल्या तापमानामुळे नागरिकांना त्रास होत आहे.