मुंबई : विद्यार्थ्यांवरील ताण, दप्तराचे ओझे कमी करताना विद्यार्थ्यांवरील अध्ययनाचे ओझे… अशा गेली वर्षानुवर्षे होणाऱ्या चर्चा या नव्या अभ्यासक्रम आराखड्यात कागदोपत्रीच राहिल्याचे दिसते आहे. विद्यार्थ्यांवरील विषयांचा भार नव्या आराखड्यात वाढणार आहे. आता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना १५ विषय अभ्यासावे लागणार आहेत. सकाळी शाळा, खासगी शिकवणी, प्रवेश परीक्षांची तयारी असा विद्यार्थ्यांचा तणावपूर्ण दिनक्रम आता अधिकच आव्हानात्मक होणार आहे.

आतापर्यंत नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या साधारण ७ विषयांमध्ये नव्या आराखड्यानुसार भर पडणार आहे. मूल्यांकन करण्यात येणाऱ्या बारा विषयांमधील १० विषयांसाठी गूण असतील तर दोन विषयांसाठी श्रेणी देण्यात येईल.

विषय कोणते? : व्यावसायिक शिक्षण, कला शिक्षण आणि आंतरविद्याशाखा विषय बंधनकारक करण्यात आले आहेत. त्यामुळे तीन भाषा, गणित, विज्ञान, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, शारीरिक शिक्षण आणि नव्याने समाविष्ट करण्यात आलेले तीन विषय असे दहा विषय असतील. त्याचबरोबर स्काऊट, गाईड बंधनकारक करण्यात आले आहे.

याला श्रेणी असेल त्याचबरोबर रस्ता सुरक्षा (आरएसजी), समाजसेवा (एनएसएस) संरक्षण (एनसीसी) यांतील एक श्रेणी विषय विद्यार्थ्यांना अभ्यासावा लागेल. नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या आंतरविद्याशाखा विषयांत नववीसाठी समाजातील व्यक्ती तर दहावीसाठी पर्यावरण विषय अभ्यासावा लागेल.

कोट

शालेय वेळापत्रकातील प्रस्तावित वेळेचे नियोजन पाहता गणित, विज्ञान विषयांसाठी सामाजिक शास्त्रांच्या तुलनेत खूपच कमी वेळ देण्यात आला आहे. तो अप्रस्तुत वाटतो. आता वाढवलेल्या विषयांना स्वतंत्र विषय म्हणून समाविष्ट करणे आवश्यक आहे का याचाही विचार होणे गरजेचे आहे.

-जयवंत कुलकर्णी, शिक्षक

शाळांच्या वेळा वाढणार?

विषयांची संख्या वाढल्यामुळे शाळांच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम होणार आहे. पहिल्या सत्रातील शाळा सकाळी ७ वाजता भरतील आणि साधारण १२.२० वाजता सुटणार आहेत. शाळेच्या सध्याच्या कालावधीत खूप वाढ दिली नसली तरी सर्व विषयांचा समावेश करून आणि प्रत्येक विषयाला न्याय देऊन वेळापत्रक तयार करताना शाळेचा कालावधी वाढवणे अपरिहार्य ठरणार आहे. दुपारच्या सत्रातील शाळांसाठी हे अधिक जिकिरीचे ठरणारे आहे, असे एका मुख्याध्यापकांनी सांगितले. आराखड्यात देण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार वर्षभर नियोजन करायचे झाल्यास अनेक मुख्य विषयांसाठी पुरेसा वेळ मिळणार नाही, असाही आक्षेप शिक्षकांनी घेतला आहे. सध्या प्रचलित पद्धतीनुसार नववीची परीक्षा शाळा स्तरावर आणि दहावीची परीक्षा राज्यमंडळाच्या स्तरावर होणार असल्याचे अभ्यासक्रम आराखड्यात स्पष्ट करण्यात आले आहे.

व्यवसाय शिक्षणात दोन वर्षात सहा व्यवसायांची ओळख विद्यार्थ्यांना करून देणे अपेक्षित आहे.त्यात नववीसाठी शेती, नळ दुरूस्ती, सौंदर्य व निरायमता या व्यवसायांची ओळख करून देण्यात येईल तर दहावीला बागकाम, सुतारकाम, परिचर्या या व्यवसायांची ओळख करून देण्यात येईल. कलाशिक्षणात दृश्यकला, नाट्य, संगीत, नृत्य, लोककला या सर्वांची ओळख करून देण्यात येईल. या विषयाला श्रेणी देण्यात येईल. सादरीकरण, शिक्षकांचे निरिक्षण, विद्यार्थ्यांचे स्वयंमूल्यमापन, गट कामगिरी, कल्पकता याआधारे मूल्यमापन करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *