माथेरान : माथेरान मधील सध्याच्या परिस्थितीत सर्व प्रभाग मिळून जेमतेम ३९०० इतकी मतदार संख्या आहे. यातील बहुतांश मतदार हे याठिकाणी वास्तव्यास नसून त्यांचा वास्तव्याचा रेशनकार्ड तसेच स्वतःच्या घराचा पुरावा नाही तर काही मतदार हे इथे नोकरी त्याचप्रमाणे व्यवसायानिमित्ताने आले होते ते इथे रहात सुध्दा नाहीत. फक्त माथेरान नगरपरिषदेच्या निवडणूक काळात प्रत्येक मताला पाच ते दहा हजार रुपये आणि वेळप्रसंगी त्याहूनही अधिक रक्कम मिळत असल्यामुळे अशी मंडळी केवळ पाच वर्षातून एकदाच आपले दर्शन देत असतात. काहींची मतदानाची नावे परिसरात असलेल्या ग्रामपंचायत मध्ये असून त्यांनी नुकताच त्याठिकाणी मतदानाचा हक्क बजावला आहे असे लोक सुध्दा आता यावेळी माथेरानमध्ये सुध्दा मतदार यादीत नावे असल्याने लोकसभा, विधानसभा आणि पुढील नगरपरिषदेच्या निवडणुकीत केवळ आर्थिक प्रलोभनांसाठी मतदार यादीत आजवर ठाम आहेत. त्यामुळे इथल्या नगरपरिषदेच्या निवडणूक काळात इथल्या उमेदवारांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. या अनाठायी मतदारांमुळे एखाद्या धनाढ्य उमेदवाराला याचा लाभ होत असतो.यासाठी इथल्या सर्वपक्षीय नेत्यांनी अशी नावे मतदार यादीमधून वगळल्यास काहीशा प्रमाणात आर्थिक बचत आणि सर्वांना फायदेशीर ठरू शकते. माथेरान बाहेर वास्तव्यास असणारे हे मतदार लोकसभा,विधानसभा निवडणुकीच्या काळात यांना समाधानकारक मोबदला मिळत नसल्यामुळे हे मतदार इकडे फिरकत सुध्दा नाहीत आणि अशाना येथील राजकीय पक्षांचे लोक गाडीभाडे देऊन आणत देखील नाहीत.एरव्ही पतसंस्था निवडणूक असो अथवा नगरपरिषदेच्या निवडणूक काळात येथील सर्वपक्षीय मंडळी चार ते पाच वेळा बाहेरील मतदारांना गोंजारण्यासाठी पायपीट करताना दिसतात. त्यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीत ३९०० पैकी जेमतेम २५०० च्या आसपास मतदान होण्याची शक्यता आहे.त्यातच निवडणूकीसाठी आलेल्या निधीचा वापर फक्त मद्यपीसाठी खर्च केला गेला तर अन्य निष्ठावंत कार्यकर्ता नाराजी व्यक्त करणार यात शंका नाही. याचाच फटका लोकसभेच्या उमेदवाराला सहन करावा लागणार आहे.असे स्थानिक बोलत आहेत.