पंतप्रधान मोदींचे विदर्भवासीयांना साकडे
अविनाश पाठक
नागपूर: देशात गत १० वर्षांपासून सत्तेत असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने खूप कामे केली आहेत. मात्र हा फक्त ट्रेलर आहे. खरा चित्रपट आम्ही पुढच्या पाच वर्षात दाखवणार आहोत. या पाच वर्षात आम्हाला विकसित भारताची पायाभरणी करायची आहे. १९ एप्रिलला आपल्याला एक खासदार निवडायचा नाही, तर येणाऱ्या एक हजार वर्षांसाठी भारताला मजबूत करण्यासाठी मतदान करायचे आहे. विकसित भारताच्या संकल्पनेसाठी मतदान करायचे आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील जनतेने आपले बहुमूल्य मत देऊन आम्हाला आशीर्वाद द्यावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.
महायुतीचे नागपूर, रामटेक आणि भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील उमेदवारांच्या प्रचारासाठी नागपूर जवळ कन्हान येथे आयोजित एका विशाल प्रचार जन सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करत होते. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागपूरचे उमेदवार नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रफुल्ल पटेल, अशोक चव्हाण यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध वृत्तवाहिन्या सर्वेक्षणे करून अंदाज देत आहेत. त्यासाठी पैसे खर्च करत आहेत.
मात्र तुम्ही पैसा कशाला खर्च करता? जेव्हा विरोधक मोदींना शिव्या देतात, मोदींच्या मातापित्यांच्या उद्धार करतात, ईव्हीएम मशीन च्या नावाने ओरड करतात तेव्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडी विजयाकडे वाटचाल करते आहे हे निश्चित दिसते, असा दावा मोदींनी यावेळी केला.
विरोधकांजवळ मुद्दे नसल्यामुळे आम्ही संविधान बदलत असल्याची ओरड विरोधक करतात याकडे लक्ष वेधत मोदी म्हणाले की संविधानाशी धोकेबाजी काँग्रेसनेच केली आहे. देशात संविधान लागू झाल्यावर ते संपूर्ण देशात लागू व्हायला हवे होते. मात्र तुम्ही काश्मीरला वेगळे संविधान का दिले? असा सवाल त्यांनी केला. असे वेगळे संविधान देण्याचा अधिकार असलेले कलम ३७० हटवण्याचे जेव्हा आम्ही ठरवले तेव्हा आम्हाला काँग्रेसनेच विरोध केला. त्यावेळी आम्हाला सांगितले जात होते की ३७० हटवले तर काश्मीर मध्ये आग लागेल. गेल्या पाच वर्षात कुठे आग लागली ते दाखवा असे आव्हान मोदींनी यावेळी दिले.
१९ एप्रिल ला तुम्ही देणार असलेले मत हे एक खासदार निवडण्यासाठी नाही तर विकसित भारताच्या पुढील एक हजार वर्षांच्या मजबूत पायाभरणीची सुरुवात करण्यासाठी द्यायचे मत आहे असे प्रतिपादन यावेळी पंतप्रधानांनी केले. विरोधक गेल्या कित्येक वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत भाजप संविधान बदलणार अशी ओरड करते. ही यांची वैचारिक दिवाळखोरीच नाही का? त्यांना आमच्या विरुद्ध टीका करायला दुसरी कोणतीही नवीन कल्पना सुचत नाही अशी टीका पंतप्रधानांनी यावेळी केली.
मोदींना तिसऱ्यांदा निवडून येऊ देऊ नका, कारण ते लोकशाही धोक्यात आणतील, अशी ओरड विरोधक करतात याकडे लक्ष वेधत आणिबाणीत लोकशाही धोक्यात कोणी आणली होती असा सवाल मोदींनी यावेळी केला. यांना परिवार वाद हवा होता. त्यामुळे एक गरीबाचा मुलगा पंतप्रधान झाला हे यांना सहन झाले नाही. काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही त्याप्रमाणेच तुम्ही या गरिबाच्या मुलाला कितीही हल्ले करून गरिबांची सेवा करण्यापासून दूर करा मात्र आम्हाला त्यापासून दूर करू शकणार नाही असा दावा त्यांनी यावेळी केला.
विरोधकांची इंडिया आघाडी ही देशाला खंडित करण्याच्या मागे लागली आहे असा आरोप मोदींनी यावेळी केला. त्यासाठी त्यांनी इतकी वर्ष जनतेत भांडणे लावली. जाती-जातीत कलह निर्माण केला.
आजही ते भांडणेच लावत आहेत. त्यांना जर मत देऊन सत्तेत आणले तर ते या देशाचे आणखी तुकडे केल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा मोदींनी यावेळी दिला.
आज देशातील विरोधक सनातन संस्कृती संपवण्याच्या मागे लागले आहेत असा आरोप करीत राम मंदिर त्यांनी गेली अनेक वर्षे होऊ दिले नाही. त्यावेळी राम मंदिर पूर्ण होऊन तिथे रामोलाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होण्याची वेळ आली त्यावेळी त्या समारंभावर विरोधकांनी बहिष्कार टाकला अशी टीका मोदींनी केली.
सनातन धर्म संपवून बघणाऱ्या या पापी लोकांना शिक्षा द्यायला हवी की नाही असा सवाल करत त्यांना पराभूत करणे हीच शिक्षा असेल असा दावा मोदींनी केला.
देशातील दलित शोषित पिडीतांना काँग्रेसने कायम मागे ठेवले इतकेच काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राजकारण संपवण्याचाही त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला असा आरोप मोदींनी केला. त्यांच्या मृत्यूनंतर इतकी वर्ष त्यांना भारतरत्नही प्रदान केला नाही अशी टीका त्यांनी यावेळी केली. आमचे सरकार आल्यावर आम्ही सामाजिक न्याय विभागाचा अर्थसंकल्पीय निधी वाढवला. ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय गठीत केले आणि सगळ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. याकडे त्यांनी लक्ष वेधले.
आपल्या भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधानांनी मराठीत सुरुवात करत प्रभू रामचंद्र नागपूर राजधानी स्थापन करणारे पहिले राजे रघुजी भोसले बाबा झुमदेव,गोंड राजे बख्त बुलंद शाह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना नमन केले. आपल्या भाषणात मोदींनी महायुती सरकारने विदर्भात काय काय विकास कामे केली त्याचाही आढावा घेतला. सीएए आणि एन आर सी या विषयावर विरोधक करत असलेल्या अपप्रचारांचाही त्यांनी आपल्या भाषणात समाचार घेतला. आजवर फक्त व्होट बँकेचे राजकारण केले असा आरोपही त्यांनी यावेळी विविध उदाहरणे देऊन केला.
सुरुवातीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नितीन गडकरी प्रवृत्तींची भाषणे झाली. यावेळी एक लाखाहून अधिक जनसमुदाय सभेसाठी उपस्थित झाला होता. सभेच्या सुरुवातीपासूनच आपकी बार चारसो पार च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
…तर फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांच्या तोंडातून फेस येईल- एकनाथ शिंदे
रामटेक: राज्यातील काही नेते फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करतात. पण नरेंद्र मोदी अशा नेत्यांकडे लक्ष देत नाहीत. मोदींनी त्यांच्याकडे नजर फिरवली तर फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांच्या तोंडाला फेस येईल, अशी खोचक टिप्पणी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंसहीत फेसबूकवरून मोदींवर टिका करणाऱ्यांवर केली. ते बुधवारी रामटेकमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत बोलत होते.
देशात सध्या तापमानाचा पारा प्रचंड वाढला आहे. मात्र, या उष्ण तापमानातही रामटेकमध्ये नरेंद्र मोदी यांना ऐकण्यासाठी लाखो लोक आले आहेत. संपूर्ण देशात मोदीनामाचा घोष सुरु आहे. त्यामुळे देशात उष्णतेच्या लाटेप्रमाणेच मोदी लाटही आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.