भंडारा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारला अपघात झाला आहे. भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ एका भरधाव वेगाने पटोलेंच्या कारला मागून जोरदार धडक दिली.
या अपघातात गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून सुदैवाने मोठी घटना टळली आहे. तर नाना पटोले हे देखील थोडक्यात बचावले आहेत. या अपघाताची माहिती मिळातच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत पुढील अधिक तपास सुरू केलाय. प्राथमिक माहितीनुसार, ट्रक चालकाचे ट्रकवरील नित्रंयण सुटल्यानं हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार प्रशांत पडोळे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आले होते. तेथील प्रचारसभा आटपून सुकळी या गावी जात असताना हा अपघात घडला.
हा घातपातच, पटोलेंना तात्काळ वाय प्लस सुरक्षा पुरवा – प्रा. कुलकर्णी
मुंबई : भंडारा येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारला झालेला अपघातमागे हा घातपातच असून याची सखोल चौकशी झाली पाहिजे. तसेच नानाभाऊ पटोले यांना तात्काळा वाय प्लस सुरक्षा पुरवा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्रा काकासाहेब कुलकर्णी यांनी केली आहे.
गेल्या अनेक दिवसापासून भाजपाच्या विरोधात नानाभाऊ पटोले हे पुराव्यानीशी भाजपाला उघडे पाडत असून भाजपा व विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. गृह विभागांनी तात्काळ याची दखल घेऊन वाय प्लस सेक्युरिटी नानाभाऊ पटोले यांना पुरवावी अशी मागणी यावेळी केली आहे.
आम्ही राजकीय प्रतिस्पर्धी, एकमेकांचे वैरी नाही – फडणवीस
मुंबई : काँग्रेसने भाजपवर जे आरोप केले आहे त्याला स्वत: नाना पटोले दुजोरा देतील, असे मला वाटत नाही. या अपघाताची माहिती मिळताच मी स्वतः हून नाना पटोले यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारणा केली. आम्ही राजकीय जीवनात जरी वेगवेगळ्या पक्षात काम करत असलो तरी, व्यक्तिगत जीवनात आम्ही एकमेकांचे शत्रू नाही किंवा आमच्यात तसे वैरही नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस प्रवक्त्यांनी भाजपावर केलेले आरोप फेटाळून लावले.
नाना पटोले यांच्या अपघाताची माहिती मिळताच मी त्यांची विचारणा केली असता, त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की, अपघात मोठा असून त्यातून मी सुखरूपपणे बचावलो असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच मी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी त्यांना शुभेच्छाही दिल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथे भव्य सभा पार पडणार आहे. या सभेसाठी देवेंद्र फडणवीस नागपूर विमानतळावर आले असता ते बोलत होते.