अशोक गायकवाड
रायगड: खाजगी बसेसमधून प्रवाशाकडून जादा भाडेदर आकारल्यास नागरिकांनी योग्य तक्रारी कळवाव्यात असे आवाहन, पेण जि. रायगडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांनी केले आहे.
१ नोव्हेंबर २०२४ पासून सुरु होणाऱ्या दिवाळी सणानिमित्त प्रवासी मोठ्या प्रमाणात गावी येत व जात असतात. त्यादरम्यान प्रवासी बसेसकडून जादा भाडे आकारल्याबद्दल वारंवार तक्रारी प्राप्त होत असतात. यास्तव खाजगी वाहतूकदारांकडून प्रवाश्यांकडून जादा भाडे – आकारण्यात येणाच्या प्रवृतीला आळा घालण्यासाठी व रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून २१.१०.२०२४ ते ९.११.२०२४ या कालावधीत खाजगी कंत्राटी प्रवासी बसेसची तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी जादा भाडेदर आकारलेबाबतची तक्रार नोंदविण्याकरिता उप प्रादेशिक परिवहन कार्यालय हेल्पलाईन क्रमांक:- २५२२३४-०२१४३ व कार्यालय ई-मेल आयडी:- dyrto.06-mh@gov.in येथे संपर्क साधावा. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण कार्यालयाच्या कार्याक्षेत्रातील खाजगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात त्या ठिकाणापासूनचे कि.मी. प्रमाणे खाजगी, बस मालकांनी पूर्ण बससाठी आकारावयाचे महत्तम भाडे बाबतचा विहित नमुन्यात तक्ता तयार करुन व त्यप्रमाणे येणारा प्रती आसन दर दर्शवून सदर खाजगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच प्रवाश्यांच्या माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक देखील प्रदर्शित करण्यात येणार आहे. ५० प्रवाशांना प्रवास करताना येणाऱ्या अडचणीबाबत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय. पेण कार्यालयाच्या ई-मेल आयडीवर तक्रार नोंदविण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. तरी नागरिकांनी योग्य तक्रारी कळवाव्यात असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण जि. रायगड यांनी केले आहे.
