अशोक गायकवाड
रायगड : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ७ मतदार संघामध्ये निवडणुक निर्भय, भयमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पडण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे व सदैव दक्ष राहून पार पाडावी, असे निर्देश पनवेल, पेण, कर्जत, उरण मतदारसंघ निवडणूक खर्च निरीक्षक राजेश कुमार यांनी दिले.
भारत निवडणूक आयोगाने रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघासाठी दोन निवडणूक खर्च निरीक्षक नियुक्त केले आहेत. पनवेल, पेण, कर्जत, उरण मतदारसंघासाठी भारतीय महसूल सेवेतील २००५ च्या तुकडीचे अधिकारी राजेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर अलिबाग, श्रीवर्धन आणि महाड मतदार संघांसाठी भारतीय महसूल सेवेतील २०१५ च्या तुकडीच्या अधिकारी ज्योती मीना यांची नियुक्ती केली आहे. त्यांचे मंगळवारी,(दि.२२ ऑक्टोंबर २०२४) रोजी रायगड येथे आगमन झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात (दि. २२) रोजी या दोन्ही खर्च निरीक्षकांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व कार्यान्वयीन यंत्रणाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे, राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिक्षक रविकिरण कोले, खर्च तपासणी विभागाचे नोडल अधिकारी तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांचेसह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते. यावेळी राजेश कुमार यांनी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांनी निवडणूक प्रक्रियेदरम्यान बँकांमध्ये होणारे दैनंदिन व्यवहार, संशयास्पद व्यवहारांवर विशेष लक्ष द्यावे. तसेच विधानसभा क्षेत्रनिहाय अतिसंवेदनशील भागाविषयी माहिती जाणून घेतली व अशा भागात विशेष उपाययोजना राबविण्याबाबत उत्पादन शुल्क विभाग, आयकर अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी यांना सुचना दिल्या. तसेच निवडणूक खर्च व्यवस्थापन वेळीच व योग्य प्रकारे करण्याच्या सुचना दिल्या. इलेक्ट्रॉनिक मिडीया, सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रसिध्द होणा-या जाहिरातींकडे लक्ष देण्याबाबत जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या नोडल अधिका-यांना निर्देश दिले. निवडणूक खर्च निरीक्षकांनी सर्व सहायक निवडणूक अधिकारी व नोडल अधिका-यांकडून निवडणूकीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीची माहिती घेतली. निवडणूक काळात प्रलोभन दाखविण्यासाठी साड्या, मद्य, वस्तू, पैसे यांचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे सजग राहून अशा बाबींना तत्काळ निर्बंध घालावा व संबंधितांवर कारवाई करावी. उमेदवाराकडून प्रचारासाठी केल्या जाणा-या प्रत्येक खर्चाची काटेकोरपणे नोंद घ्यावी. निवडणूक आयोगाच्या निर्देश व सूचनांचा कुठेही भंग होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी, असेही निर्देश खर्च निरीक्षक राजेश कुमार यांनी दिले.निवडणूक खर्च निरीक्षक ज्योती मीना यांनी सहकारी बँका मार्फत होणारे व्यवहार तसेच राष्ट्रीयकृत बँका मार्फत होणारे व्यवहार यावर करडी नजर ठेवण्याचे निर्देश दिले. पेड न्युज वर देखील विशेष लक्ष ठेवावे असेही सांगितले. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार प्रत्येक यंत्रणेनी कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या.यावेळी सर्व कार्यान्वयीन यंत्रणानी केलेल्या कार्यवाहीचा आढावा सादर केला.यावेळी खर्च निरीक्षक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाला भेट दिली आणि आढावा घेतला.