अनिल ठाणेकर
मुंबई : शाश्वत कोकण परिषदेचा जाहीरनामा करण्यामागची कारणे, प्रक्रिया व जाहिरनाम्यातील मुद्दे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना संक्षिप्तपणे माहिती देण्यात आली. उध्दव ठाकरे यांनी, शाश्वत कोकण परिषदेचा जाहीरनामा लक्षपूर्वक पाहिला आणि या जाहीरनाम्याचे सादरीकरण व डिझाईनचे कौतुक केले. तसेच त्यात घेतलेल्या कोकणातील मुद्द्यांची दखल घेतली जाईल असे सांगून जाहिरनाम्याच्या आणखीन प्रती देण्याचे आवाहन केले .शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बारसु- सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेने मंगळवारी भेट घेतली आणि त्यांना शाश्वत कोकण परिषदेचा जाहीरनामा सुपूर्द करण्यात आला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची धोरणे ठरवताना शाश्वत कोकण परिषदेचा जाहिरनाम्यातील मुद्द्यांचा उद्धव ठाकरे हे नक्कीच विचार करतील असा आशावाद शाश्वत कोकण परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव व आमदार मिलिंद नार्वेकर, सचिव व माजी खासदार विनायक राऊत, राजापूर लांजा विधानसभेचे आमदार राजन साळवी, राजापूर तालुका संपर्क प्रमुख अनिल भुवड, बारसु सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेतर्फे मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकर, सरचिटणीस नरेंद्र जोशी, आदेश भोवड, सूर्यकांत सोडये, विनायक शिंदे, संतोष तिरलोटकर, स्वप्नील सोगम, गोपीनाथ घाडी, तुळशीदास नवाळे, महेंद्र गुरव, अमित नेवरेकर, शाश्वत कोकण परिषदेचे सत्यजीत चव्हाण, नाणारचे माजी सरपंच ओमकार देसाई, पाळेकर वाडी (नाणार) चे प्रमुख सत्यवान पाळेकर व धनाजी वालम आदी मान्यवर उपस्थित होते.
चौकट
कोकणातील जनतेच्या, मुंबई, वसई, सावंतवाडी, चिपळूण, चिंचणी (पालघर) व पेण येथील झालेल्या परिषदांच्या विचारमंथनातून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणच्या निसर्ग व संस्कृती यांच्या शाश्वत अस्तित्त्वासाठी कोणती धोरणे अंमलात आणावी, कोणते प्रकल्प हवेत – नकोत याची स्पष्ट दिशा दर्शविणारा कोकण परिषदेचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यात प्रदूषणकारी प्रकल्प कोकणात प्रस्तावित न करणे , ग्रीनफिल्ड व शक्तीपीठ महामार्ग रद्द करणे, सिडको व एम एस आर डी सी यांना कोकण किनारपट्टी भागातून नियोजनाचा अधिकार देणारे अध्यादेश रद्द करणे, जंगलतोड बंदी, दोडामार्ग तालुक्याचे संरक्षण, जांभ्याच्या सड्यावरील जैव विविधतेचे संरक्षण, अवैध एल इ डी , परसिनेट मासेमारीवर कृती अशा मागण्यांना धोरणात्मक निर्णयात सामील करण्याचे म्हंटले आहे.प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालय , विद्यापीठ , अंगणवाडी -आशा वर्कर्स यांना वाढीव अनुदान, कातळशिल्प संरक्षण , बोली भाषेचे जतन, स्वयंरोजगारावर भर, कृषी प्रक्रिया केंद्रे, कोकण रेल्वेचे थांबे वाढवणे आदी मागण्याही करण्यात आल्या आहेत. या जाहीरनाम्यात कोकणी जनतेने अजून भर घालावी अशी अपेक्षा आहेच तरीही हा जाहीरनामा राजकीय पक्ष, उमेदवार, कार्यकर्ते आणि कोकणातील सर्वच जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा असे आवाहन करण्यात येत आहे. शाश्वत कोकण परिषदचे समन्वयक सत्यजीत चव्हाण व शशी सोनावणे यांचेद्वारा प्रस्तुतचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे.
