भिवंडी : भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काल्हेर येथील माजी सरपंच स्नेहा देवेंद्र पाटील यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. कॉम्प्युटर इंजिनिअर असलेल्या असलेल्या स्नेहा पाटील यांनी भिवंडी ग्रामीणच्या विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवित असल्याचे जाहीर केले.
भिवंडी येथील फरहान हॉलमधील निवडणूक कार्यालयात माजी सरपंच स्नेहा पाटील यांनी आज मिरवणुकीने उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काल्हेर येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर श्री वेताळ महाराज मंदिरात दर्शन घेऊन प्रार्थना केली.,
निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करताना माजी सरपंच छत्रपती पाटील, श्रीधर पाटील, यशवंत सोरे, राजन भोईर, जयवंत पाटील, राजन मढवी, निलेश गुरव, दयानंद पाटील, श्रीकांत गायकर आदींसह हजारो नागरिकांची उपस्थिती होती.
भिवंडी ग्रामीण भागातील महिलांसह विविध प्रश्न विधानसभेत प्रभावीपणे मांडले गेले नाहीत. तालुक्यातील गावे व दुर्गम भागातही पिण्याचे पाणी मिळत नसून, अनेक रस्त्यांची स्थिती दयनीय आहे. तालुक्यातील महिलांना स्थायी रोजगार मिळवून देण्यासाठी महिला सक्षमीकरण गरजेचे आहे. तालुक्यातील विविध प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे आपण मतदारांच्या आग्रहानुसार निवडणूक लढवित असल्याचे स्नेहा पाटील यांनी सांगितले.
चौकट
उच्चशिक्षित उमेदवार स्नेहा पाटील निवडणूक रिंगणात
दरम्यान, स्नेहा पाटील या उच्चशिक्षित उमेदवार असून, त्यांनी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. तसेच त्यांनी विक्रमगड येथील शासकीय पदविका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम पाहिले. मुंबईतील कलिना येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये वैज्ञानिक अधिकारी म्हणून कार्य केले. त्यांनी काल्हेर ग्रामपंचायतीचे सरपंचपद भूषविले होते. सध्या त्या लाडकी बहीण योजनेच्या आढावा समितीत अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
0000
