मुंबई: अंधेरी पश्चिम विधानसभा मतदार संघासाठी भाजप, शिवसेना, रिपाई महायुतीचे उमेदवार अमीत भास्कर साटम यांनी आज गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आमदार साटम यांनी जुहू कोळीवाडा जंक्शन ते एसएनडीटी कॅम्पस पर्यंत जंगी रॅली काढत शक्ती प्रदर्शन केले.
सकाळी दहा वाजता जुहू कोळीवाडा जंक्शन पासून आमदार अमीत साटम यांच्या रॅलीला प्रारंभ झाला. जुहू तारा रोड ते सांताक्रुज येथील एसएनडीटी कॅम्पस पर्यंत रॅली काढण्यात आली. ‘अंधेरी बोले दिल से, अमित साटम फिरसे’ अशा घोषणा या रॅलीमध्ये देण्यात येत होत्या. रॅलीमध्ये भाजप, शिवसेना, रिपाई, महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सामील झाले होते.
आमदार अमीत साटम यांनी एसएनडीटी कॅम्पस येथील निवडणूक कार्यालयात नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, शिवसेना विभागप्रमुख अल्ताफ पेवेकर, शिवसेना संघटक पराग कदम, भाजपचे माजी नगरसेवक अनिश मकवानी, रोहन राठोड, सुधा सिंग, रेणू हंसराज आणि भाजपचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बंदेरी उपस्थित होते.
यावेळी आमदार अमीत साटम म्हणाले की, ५८ उद्यानांचा विकास, १०० हून अधिक नवीन रस्ते, जुहू बीच सुशोभीकरण प्रकल्प, गिल्बर्ट हिल संवर्धन प्रकल्प, ४०० हून अधिक सीसीटीव्ही, २५ हून अधिक सामुदायिक केंद्रे आणि झोपडपट्ट्यांमध्ये १०० हून अधिक शौचालये आदी शेकडो कामे अंधेरी पश्चिम मध्ये केली आहेत. विकासाचा हा रथ पुढे नेण्यासाठी अंधेरीचे नागरिक मला तिसऱ्यांदा निवडून देतील याची खात्री असल्याचे आमदार साटम म्हणाले.
भाजपने ९९ उमेदवारांची नुकतीच पहिली यादी जाहीर केली त्यामध्ये आमदार अमीत साटम यांच्या नावाचा समावेश होता. साटम यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये ६५ हजार ६१५ मते मिळाली होती. काँग्रेसचे अशोक जाधव यांना ४६ हजार ६५३ मते मिळाली होती.
