नवी मुंबई महानगरपालिकेचे ईटीसी दिव्यांग शिक्षण, प्रशिक्षण व सेवा सुविधा केंद्र हे एकाच छताखाली सर्व प्रकारच्या दिव्यांगांना सामावून घेणारे देशातील अग्रगण्य केंद्र म्हणून नावाजले जाते आहे. केंद्रामार्फत दिव्यांग सक्षमीकरणासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत असतात.
असाच एक अभिनव उपक्रम दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेला असून या अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांनी ईटीसी केंद्रात तसेच पालकांच्या मदतीने घरी बनविलेल्या दिवाळी सणामध्ये उपयोगी असणा-या वस्तूंचे प्रदर्शन महापालिका मुख्यालयात आणि ईटीसी केंद्रात आयोजित करण्यात आले होते.
यामध्ये महापालिका अधिकारी, कर्मचारी तसेच मुख्यालयाला व केंद्राला कामानिमित्त भेट देणा-या नागरिकांनी मोठया संख्येने या प्रदर्शनाला भेट देत दिव्यांगांनी बनविलेल्या आकर्षक वस्तूंची प्रशंसा केली तसेच या वस्तूंची खरेदीही केली.
या प्रदर्शनाच्या ठिकाणी 20 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती करणारे विविध संदेश असलेले फलक प्रदर्शित करण्यात आले होते.
महानगरपालिकेच्या ईटीसी केंद्रामध्ये 15 ते 18 वयोगटातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी पूर्व व्यावसायिक प्रशिक्षण दिले जात आहे. हे प्रशिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या कौशल्याला वाव मिळावा व त्यांना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने प्रेरणा मिळावी या करिता प्रशिक्षण व रोजगार ही कार्यप्रणाली प्रभावीपणे राबविली जात आहे.
या अंतर्गत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिव्यांग विद्यार्थ्यांनी केंद्रात तसेच घरी पालकांच्या मदतीने बनविलेल्या दिवाळीत उपयोगी वस्तूंचे प्रदर्शन महापालिका मुख्यालयात आणि ईटीसी केंद्रात उपआयुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे यांच्या पुढाकारातून भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाला लाभलेल्या उत्तम प्रतिसादामुळे दिव्यांग विद्यार्थी व व्यक्ती यांच्या आत्मविश्वासात भर पडली असून त्यांना वस्तू विक्रीतून रोजगारही उपलब्ध झालेला आहे.
