१३ ते २० नोव्हेंबर या कालावधीत
ठाणे : सर्वत्र विधानसभा सार्वत्रिक २०२४ च्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून निवडणूक शांततेत व नि:पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक निकालाचे अंदाज (Exit Poll) १३ नोव्हेंबर सकाळी ७ पासून ते २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत या कालावधीत प्रसारमाध्यमांवर प्रसारित करण्यास प्रतिबंध केले आहे.विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. मतमोजणीच्या ४८ तास आधीपासून ते मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यत निकालाचे व कोणत्याही सर्वेक्षणाचे अंदाज प्रसिद्ध करु नये. तरी आयोगाने दिलेल्या सूचनांचे पालन सर्व प्रसारमाध्यमांनी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.
ठाणे विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रसारमाध्यमांवर निकालाचे अंदाज (Exit Poll) (प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, दूरदर्शन आकाशवाणी) प्रकाशित करू नये. तसे आढळून आल्यास लोकप्रतिनिधी कायदा १९५१ कलम १२६ अ कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी नमूद केले आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीचे आदर्श आचारसंहिता सुरू असून भारतीय निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार जिल्ह्यातील सर्व प्रसारमाध्यमांनी काळजी घ्यावी, असेही आवाहन जिल्हा निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी स्वीपच्या माध्यमातून सर्व विधानसभा मतदारसंघात जनजागृती करण्यात येत आहे. गुरूवारी (२४ नोव्हेंबर) १४७ कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील वागळे इस्टेट येथील के.बी.पी महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली.लोकशाहीने दिलेला मतदानाचा अधिकार प्रत्येकाने बजावावा, आपले मत अमूल्य आहे, अशा प्रकारची जनजागृती करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना मतदानाची शपथ देण्यात आली. तसेच संकल्पपत्राचे वाटप करण्यात आले. या विद्यार्थ्यांनी देखील २० नोव्हेंबर रोजी आपण मतदान करणार आहे, तसेच मतदानासाठी घरातील पालक, आजूबाजूच्या परिसरातील नागरिक व मित्रपरिवाराला देखील मतदान करण्याबाबत आवाहन करणार असल्याचा विश्वास स्वीपच्या टीमला दिला. यावेळी महाविद्यालयातील एक विद्यार्थ्यांना मतदान जनजागृतीपर तयार केलेली कविता सादर केली. रॅलीच्या माध्यमातून केली मतदानाची १५९ कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात स्वीपच्या माध्यमातून ठामपा शाळा क्र. ७३ मधील विद्यार्थ्यांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी मतदान रॅली काढून परिसरातील नागरिकांना मतदान करण्याचा संदेश दिला.“मतदान हमारा अधिकार है, इससी अपनी सरकार बनती है..” अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी परिसरातून जनजागृती काढली. या रॅलीत शाळेतील शिक्षक देखील सहभागी झाली होते. यावेळी विद्यार्थ्यांना आपल्या घरातील पालकांना तसेच परिसरातील नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे असा संदेश देण्यात आला. या रॅलीस नागरिकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
