मुंबई:- खेळात टिकायचे असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे, असे उदगार शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू धनंजय महाडिक यांनी ओम् कबड्डी प्रबोधिनीच्या २१व्या वर्धापन दिनी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना काढले. आज सर्वच खेळ गतिमान झाले असून मातीतील खेळ मॅट वर खेळले जाऊ लागले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस खेळाच्या कौशल्यात बदल होत आहेत. त्यात टिकून रहायचे असेल व प्रगती करावयाची असेल, तर नवनवीन तंत्रज्ञान अवगत करून ते आत्मसात करावयास हवे, असे पुढे धनंजय महाडिक म्हणाले.

ओम् कबड्डी प्रबोधिनीच्यावतीने प्रतिवर्षी आपल्या वर्धापन दिना निमित्त ज्या कबड्डीपटूने आपल्या दैदिप्यमान खेळाने जिल्हा व राज्यस्तरावर आपल्या खेळाचा ठसा उमटविला अशा ज्येष्ठ पुरुष व महिला खेळाडूंचा गौरव केला जातो. यंदा नवयुग क्रीडा मंडळ व बँक ऑफ महाराष्ट्राची सौ.अंजली अजित वैशंपायन (पूर्वाश्रमीची स्मृती देव) यांना महिलांत, वडेश्र्वर सेवा मंडळ व सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या चंद्रकांत परब (पिरवरे) यांना पुरुषांत हा पुरस्कार देऊन महाडिक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर प्रतिवर्षी होणाऱ्या कबड्डी प्रशिक्षण शिबिरात शिस्तबध्द खेळ करून मनापासून प्रशिक्षण घेणाऱ्या दोन शिबिरार्थिना रोख रकमेचे पारितोषिक देऊन गौरविण्यात येते. यंदा हा मान श्रीराम विश्र्वस्त संघाचा आदित्य पारले व विजय क्लबच्या श्रेयस फुलोरी यांनी पटकाविला. या कार्यक्रमाला क्रीडा प्रेमींनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून प्रबोधिनीच्या कार्याचा योग्य सन्मान केला. माजी महापौर व कबड्डी खेळाडू महादेव देवळे सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते. स्वामी समर्थ क्रीडा मंडळाचे कबड्डी प्रेमी सचिव महेश सावंत, प्रबोधिनीच्या अध्यक्षा व अर्जुन पुरस्कार प्राप्त सौ. माया मेहेर, तारक राऊळ, सिताराम साळुंखे (दोन्ही छत्रपती पुरस्कार प्राप्त) उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *