मुंबई : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाची तिसरी यादी रविवारी जाहीर करण्यात आली. या तिसऱ्या यादीमध्ये ९ जणांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. या ९ जणांच्या यादीमध्ये अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद अहमद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटाकडून त्यांना अणुशक्तीनगर येथून तिकीट देण्यात आलं आहे.

अभिनेत्रीचे पती विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

स्वरा भास्करचे पती फहाद अहमद विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांच्या नावाची चर्चा होती. महाविकास आघाडीचा मित्रपक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने काही दिवसांपूर्वी विधानसभेसाठी मुंबईतील अणुशक्तीनगरची जागा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं म्हटलं होतं. समाजवादी पक्षाकडून फहाद अहमद हे अणुशक्तीनगरची जागा लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र आता त्यांनी समाजवादी पक्षाला रामराम करत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून त्यांना अणुशक्तीनगरसाठी तिकीट देण्यात आलं आहे.

कोण आहे फहाद अहमद?

अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद अहमद यांनी २०२२ मध्ये समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर ते तेथे युवा आघाडीचे अध्यक्ष होते. त्यांनी विद्यार्थी संघटनांमध्ये काम करत अनेक आंदोलनांमध्ये सक्रीय सहभाग घेतला होता. अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या फी माफीच्या मुद्द्यावरुन त्यांनी अनेकदा आंदोलनं केली होती.

दरम्यान, मुंबईतील अणुशक्तीनगरची जागा ही नवाब मलिक यांचा बालेकिल्ला मानला जातो. या जागेवर आता नवाब मलिक आमदार आहेत. नवाब मलिक यांच्यावर मनी लाँड्रिंगसारखे आरोप आहेत. याप्रकरणात त्यांना अटक झाली होती. ते जेलमध्ये होते. त्यामुळेच त्यांना अणुशक्तीनगरमधून उमेदवारी दिली नसल्याचं बोललं जातं. मात्र २०२४ च्या विधानसभेसाठी आता यांच्या मुलीला सना मलिक यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अणुशक्तीनगर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात सना मलिक यांची चांगली पकड आहे. त्यामुळे आता शरद पवार यांच्या गटाकडून फहाद अहमद आणि अजित पवारांच्या गटाकडून सना मलिक यांना अणुशक्तीनगरची जागा दिल्यानंतर कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *