घाटकोपर – घाटकोपर येथे दिवाळीनिमित्त जवळपास साडेतीन हजार अंध बांधवांना दिवाळीची भेट म्हणून रवा, मैदा, साखर, तूप, तेल, चहापावडर, हळद पावडर, मिरची पावडर, मिठाई, फरसाण आदी अन्नपदार्थांचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम ओमकार अंध केवक सोसायटी या संस्थेच्या वतीने आयोजित केला होता. गेल्या ३६ वर्षांपासून या संस्थेच्या वतीने दरवर्षी अंध बांधवांसाठी हा कार्यक्रम पंतनगर येथील जनरल अरुणकुमार वैद्य मैदानात आयोजित केला जातो. संस्थेचे सर्वेसर्वा धर्मेश गिरी, अशोक देवरे पाटील, विपुल मेहता, प्रवीण तन्ना, नितीन शहा, निरुपा शहा, डॉ अनिल सॅम्युअल आदी या वेळी उपस्थित होते. शिवआरोग्य सेनेचे मुंबई समन्वयक प्रकाश वाणी, समाजसेवक रवींद्र कोठवदे, दुर्गा परमेश्वरी मंदिर ट्रस्टच्या राखी जाधव यांच्या हस्ते अंध बांधवांना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले. या वेळी राज्यभरातून येणाऱ्या अंध बांधवांसाठी घाटकोपर रेल्वे स्थानक ते जनरल अरुणकुमार वैद्य मैदानापर्यंत सुमारे २०० रिक्षांची व्यवस्था करण्यात आली होती.
00000
