मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडांनंतर कल्याण शहराचे पक्षप्रमुख निष्ठेने सांभाळणाऱ्या सचिन बासरे यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली आहे. कल्याण पश्चिमेत महायुती व महाविकास आघाडीमध्ये ‘कांटे की टक्कर’ होणार आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांच्याशी बासरे दोन हात करतील.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मात्र एक पाऊल पुढे जात निष्ठावंत म्हणून ओळखले जात असणारे शहर प्रमुख सचिन बासरे यांना तिकीट घोषित करून शिंदे गटाला चपराक दिल्याचे बोलले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे कल्याण पश्चिम येथील प्रमुख कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर भेट घेऊन निष्ठावंतांनाच येथून तिकीट देण्याची जोरदार मागणी केली होती. अखेर सायंकाळी उशिरा ठाकरे यांनी निष्ठावंतांच्या मागे शिवसेना असल्याची दाखवून देत कल्याणचे शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक सचिन बासरे यांना तिकीट घोषित करीत एबी फॉर्म देखील दिल्याची माहिती सेना कार्यकर्त्यांनी दिली आहे.
कल्याणच्या काळा तलावाचे सुशोभीकरण असो अथवा कल्याणमधिल देशातील बाळासाहेबांचे पहिले स्मारक, यात बासरे यांनी स्वता पुढाकार घेतला होते. स्थानिक कार्यकर्त्यांसोबत असलेली निष्ठेची वीण ही बासरे यांची जमेची बाजू आहे. याऊलट विद्यामान आमदार विश्वनाथ भोईर यांना शिंदेंच्याच शिवसेना पक्षातून विरोध होत होता. भाजपादेखील या जागेसाठी आग्रही होता. त्यामुळे भोईर यांना महायुतीतच आधी सलोखा घडवून आणण्याचे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे.
