भारतीय राष्री्रय काँग्रेस महाराष्ट्रात सध्या मोठ्याच अडचणीत सापडलेली आहे. जिंकण्याची शक्यता असणारी निवडणुक सुरु झालेली आहे. दहा वर्षानंतर राज्यातली भाजपेतर बाजूचा सर्वात मोठा पक्ष काँग्रेस ठरू शकेल, असे 2024 च्या लोकसभेचे निकाल आले आहेत. नेते, कार्यकर्तेही व समर्थकही उत्साहत आहेत. पण, पण, पण…! मित्रपक्षांनी पाय खेचल्यामुळे लढण्यासाठी हव्या तितक्या व हव्या त्या जागा काँग्रेसला मिळलेल्या नाहीत. खरेतर 2019 च्या विधानसभा निकालात काँग्रेसचे आमदार कमी झाले आणि त्यांची मतेही पूर्वीच्या 19 टक्क्यांच्या मानाने बरीच कमी झाली होती. पण आता 2024 च्या लोकसभा निकालात काँग्रेसचा स्ट्राईक रेट व मतांची टक्केवारीही सुधारलेली आहे. मित्रपक्षां पेक्षा कांकणभर अधिक टक्केवारीची मेत काँग्रेसने घेतली आणि पडलेल्या एकूण मतांमध्येही काँग्रेसच मविआत आघाडीवर आहे. 2024 च्य लोकसभा निवडणुकीत काँग्रसने 96 लाख 41 हजार मते घेतली सेना उबाठाने 95 लाख 22 हजार मते घेतली तर शरद पवार राकाँने 58 लाख 51 हजार मते घेतली होती. म्हणजेच शरद पवारांचा पक्ष आणि उद्धव ठाकरेंची सेना यांच्या पेक्षा अधिक जनता ही राज्यात काँग्रेसच्या मागे आहे, हे स्पष्ट झाले. पण तरीही विधानसभेच्या लढतीत मात्र काँग्रेसचा हात कधी नव्हे इतका गेल्या तीस व पस्तीस वर्षात जे झाले नाही ते काँग्रेसला आत्ता दिसते आहे. अगदी 2019 च्या निवडणुकीतही काँग्रेसने विधानसभेच्या 164 मतदारसंघात उमेदवार दिले होते. या वेळी मात्र इतिहासात प्रथमच काँग्रेसचा हात शंभरपेक्षा कमी जागी लढणार आहे. त्यामुळेच मग स्ट्राईकरेटचे गणित पाहता काँग्रेसला विधानसभेत किती आमदार निवडून आणता येतील हे एक मोठे प्रश्नचिन्ह पक्षापुढे उभे आहे. देशावर स्वतांत्र्य प्राप्तीपासून किमान सहा दशके या पक्षाने देशात राज्य केले. महाराष्ट्रात तर मुंबई प्रांता पासून ते संयुक्त महाराष्रापापर्यंतचा सारा काळ हाच पक्ष राज्यकर्ता होता. 1977 मध्ये प्रथम काँग्रेसची महाराष्ट्रातील सत्ता गेली आणि त्यांच्यातूनच फुटून बाहेर पडलेला एक नेता, शरद पवार, हे विरोधकांना हाताशी धरून सत्तेत बसले. दहा वर्षांनी पवार पुन्हा काँग्रेसमध्ये परतले खरे पण मग महाराष्ट्रातील काँग्रेमध्ये शरद पवार विरुद्ध इतर नेते, म्हणजेच फुटीर प्रवृत्तीचे पवार समर्थक आणि पक्षाशी सातत्याने प्रामाणिक रहिलेले निष्ठावान असा संघर्ष सुरु झाला. काँग्रेसच्या राज्यातील घसरणीचीही तीच सुरुवात होती. तरीही 80 च्या दशकात काँग्रेसने सातत्याने दमदार कामगिरी केली. 1995 पर्यंत सत्ता टिकवून धरली. पण विधानसभेतील काँग्रेसच्या जागा सातत्याने कमी होत होत्या. शरद पवार नेतृत्व करत होते तेंव्हा म्हणजे 1990 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस प्रथम बहुमताच्या आकड्या पेक्षा कमी राहिली. पक्षाला सत्ता स्थापनेसाठी तीन चार आमदार कमी पडत होते. अपक्ष व लहान पक्षांच्या पाठिंब्याने काँग्रेसची सत्ता सहज स्थापनही झाली. पण ती टिकवण्यासाठी आधी जनता दल पवारांनी व सुधाकरराव नाईकांन मिळून फोडले. पाठोपाठ शिवसेनेत उभी फूट पाडण्याचा प्रयत्न केला. बबन पाचपुते, बबनराव ढाकणे हे जनताचे नेते तर छगन भुजबळ हे शिवेसनेचे नेते तेंव्हा काँग्रेसमध्ये दाखल झाले. पण त्या पक्ष फोडाफोडी नंतर 1995 च्या निवडणुकीत काँग्रेसची सत्ता पूर्णतः लयाला गेली. शिवेसनेचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे उपमुख्यमंत्री अशी युतीची सत्ता स्थापन झाली. त्या नंतरची वीस वर्षे ही महाराष्ट्रासाठी संयुक्त सरकारांची सत्ता होती 1995 ते 1999 सेनेच्या युतीची सत्ता. नंतरची पंधरा वर्षे जुनी काँग्रेस आणि शरद पवारांची फुटीर राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता राहिली. पण त्या सत्तेलाही 1999 मध्ये जनता पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, समजावादी, कम्युनिस्ट अशांचे टेकू काँग्रेसला घ्यावे लागले होते. संयुक्त पुरोगामी दलाची ती सत्ता सुरुवातीची पाच वर्षे मित्रपक्षांवर अवलंबून होती. पण 2004 व 2009 च्या निवडणुकांमध्ये हे छोटे पक्ष आणखी आक्रसत गेले आणि काँग्रेसचे मुख्यमंत्री राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर दिमाखात सत्तेत बसले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील तरूण नेत्यांच्या महत्वाकांक्षांना शरद पवार हे सातत्यने मुरड घालत होते म्हणूनच कमी आमदार हाती येऊनही काँग्रेसचे मुख्यमंत्री सत्तेत राहिले. त्या पंधरा वर्षात सधी असूनही पवारांनी भुजबळ वा आर. आर. आबा वा जयंत पाटील वा अजितदादा पवार यांना कुणाला राज्याचे नेतृत्व करण्याची संधी दिली नाही. त्या ऐवजी जादा मंत्रीपदे रा.काँ.ला द्या व मुख्यमंत्रीपद तुमच्याकडेच ठेवा, हे धोरण पवारांनी घेतले. राज्यातील किंगमेकरची ती भूमिका शरद पावारांना आजही हाती ठेवायची आहे !! 2014 ते 2024 हा सारा काळ तर आपल्या सर्वांच्या डोळ्यांपुढे आहेच. राजकीय चमत्कार घडवत मोदी शहांच्या भाजपाने महाराष्ट्रात देवेन्द्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सलग दोन निवडणुकात शंभर पेक्षा अधिक आमदार निवडून आणले. अशी कामगिरी काँग्रेस 1980-1990 च्या कालावधीत अखेरची करून दाखवली होती. वीस पंचवीस वर्षांनंतर प्रथमच एखाद्य पक्षाने आमदरांची शंभरी पार केली व तीही सलग दोन निवडणुकांमध्ये. काँग्रेसने असे शतक गाठणे केंव्हाच सोडून दिले आहे. आता मित्रपक्षांच्या दादागिरीत काँग्रेसची विजयाची शक्यता अधिकाधिक आक्रसते आहे. विजयी सोडाच कँग्रेस ता शंभर जागी लढणारही नाही. 1995 नंतर 80 आमदार येणे हीच काँग्रेसची सर्वोत्तम कामगिरी राहिली होती. 2014 नंतर तर पन्नाशी गाठतानाही काँग्रेसची दमछाक झाली. शरद पवारांसह काँग्रेसचे पानीपत 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत झाले. ते चित्र आता 2024 ला एकदम नाट्यपूर्ण रीत्या बदलेले. शरद पवारांचे स्वबळावर 8 खासदार लोकसभेत पोचले. दोन जागा त्यांनी थोडक्यात गमावल्या. आजवर स्वबळावर त्यांना कधीच लोकसभेत दोन अंकी खासदार नेता आले नाहीत. ते 2024 ला जमले असते पण थोडक्यात हुकले. काँग्रेसने या दोन्ही वेळा शून्यवत कामगिरी केली. या पक्षाचे देशातही तेच होते. जितके आमदार महाराष्ट्र विधानसभेत तितकेच खासदार देशभरातून लोकसभेत अशी स्थिती होती. 2024 ला काँग्रेस एकदम दणक्यात उसळली. महाराष्ट्रातून तब्बल तेरा तर देशभरातून 99 खासदार काँग्रेसला संसदेत पाठवता आले. महाराष्टरात ठाकरे सेनेच्या तोरेबाजी पुढे काँग्रेस तेंव्हाही झुकली होती. लोकसभेला उबाठाने 21 जागा लढवल्या. काँग्रेसने सतरा जागांवरच समाधान मानले. पण काँग्रसेचा स्ट्राईकरेट जबरदस्त राहिला. 17 पैकी 13 जागी विजयी व 14 वी सांगली लोकसभेची विशाल पाटलांची अपक्ष जागा. तेही विजया नंतर पुन्हा काँग्रसमध्ये आल्याने 18 पैकी 14 जागा हाताने जिंकल्या असेच म्हणावे लागेल. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने महाराष्रा.हत विधानसभेच्या किमन 125 ते 150 जागा लढवायला हव्या होत्या. पण आजमितीस शंभरही जागा काँग्रेसच्या पदरी नाहीत. विजयाचे गणित आता काँग्रेससाठी आणखी अवघड बनले आहे. नाना पटोले, बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार असे चर्चा बैठकींत समोरच्या पक्षांवर दबाव टाकू शकतील असे नेते जागावाटपात बसले होते. तरीही मित्रपक्षांच्या तावडीतून अधिक जागा काँग्रेसला सोडवून घेतला आल्य नाहीत, या विषयी दिल्लीत पक्षांच्या शीर्शस्थ मध्यवर्ती उमेदवार निवड समितीच्या बैठकीत राहूल गांधींनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की तुम्हाला चर्चेत आपल्या बजूने निकाल घेता आला नाही. ओबीसी व अल्पसंख्याक हा घटक जिथे अधिक आहे, अशा जागा काँग्रेसने लढायला हव्या होत्या. तशी राहुला गांधींची अपेक्षा होती. पण पटोले व कंपनीने ती फोल ठरवली. या पूर्वीच्या तीन निवडणुकांत काँग्रेसने 170, 160 अशा संख्येने आमदारकीच्या जागा लढवल्या होत्या. त्यात त्यांनी तीस टक्के निवडून आणल्या. आता 90 – 95 जागा काँग्रेस लढवणार आहे. त्यात अगदी पन्नास टक्के स्ट्राईक रेट राहिला, तरी त्यांची विजयी आमदारांची संख्या पुन्हा पन्नासच्या आसपासच अडेल अशी साधार भीती आहे. तसे झाले तर मग नेत्यांना आज ज्याची आशा वाटते आहे, त्या मविआच्या संभाव्य सत्तेचे नेतृत्व तरी काँग्रेसच्या हाती राहील का ? की नाही राहणार ? मुळात नव्वद नव्वद जागा लढणाऱ्यंचे भवितव्य का राहील ? हा सवाल नेत्यंना अस्वस्थ करतो आहे. मित्रपक्षां बरोबरच्या वाटाघाटीमध्ये काँग्रेसची चांगलीच गोची झालेली आहे.