नवी मुंबई : 20 नोव्हेंबर रोजी होणा- निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यादृष्टीने 150 व 151 विधानसभा निवडणूक कार्यालयांप्रमाणेच नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार स्वीपचे नोडल अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली विविध पातळयांवर मतदार जनजागृती करण्यात येत असून त्याकरिता वेगवेगळया माध्यमांचा वापर करण्यात येत आहे.
या अनुषंगाने ऐरोलीमध्ये सेक्टर 5 येथील सरस्वती विद्यालयाच्या वतीने परिसरात जनजागृती रॅली काढून नागरिकांपर्यंत मतदान करण्याचा संदेश व आवाहन पोहचविण्यात आले.
त्याचप्रमाणे सकाळच्या वेळी उद्यानांमध्ये जॉगींग करण्यासाठी व योगासने करण्यासाठी मोठया प्रमाणावर नागरिक उपस्थित असतात हे लक्षात घेऊन स्वीप पथकाने सेक्टर 10 ऐरोली येथील उद्यानात नागरिकांची भेट घेऊन त्यांना मतदानाचे महत्व पटवून दिले तसेच 20 नोव्हेंबरला मतदान करण्याचे आवाहन करीत मतदार प्रतिज्ञाही घेण्यात आली.
अशाच प्रकारे सेक्टर 5 येथील भाजी मार्केटमध्ये भाजी विक्रेते व खरेदी करण्यासाठी येणारे ग्राहक यांच्या भेटी घेऊन स्वीप पथकाने मतदान करण्याविषयी आवाहन केले व मतदान हे आपले कर्तव्य असल्याची जाणीव करुन दिली.
याशिवाय बेलापूर व ऐरोली या दोन्ही मतदार संघाच्या स्वीप पथकांनी रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सोसायट्यांमध्ये रहिवाशांच्या भेटी घेऊन प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावावा यासाठी व्यापक जनजागृती केली.
