जोरदार शक्ती प्रदर्शन करत अपक्ष म्हणून दाखल केला अर्ज…!
सिंधुदुर्ग :सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी बंडखोरी करत जोरदार शक्ती प्रदर्शन करत अपक्ष म्हणून कल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
या मतदारसंघातून भाजपाचे ते इच्छुक उमेदवार होते.मात्र हा मतदार संघ शिंदे गटाच्या वाट्याला आल्याने विद्यमान आमदार,राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची उमेदवारी शिंदे सेनेने जाहीर केली.महायुतीचे उमेदवार म्हणून आता केसरकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत.भाजपामधील आणखी एक इच्छुक असलेले माजी आमदार आणि केसरकर यांचे कट्टर विरोधक राजन तेली यांनी अचानकपणे भाजपा मधून बाहेर पडून ऊबाठा सेनेत प्रवेश केला आणि सेनेची उमेदवारीही मिळवली.या मतदार संघात आता केसरकर विरुद्ध तेली ( सेना विरुद्ध सेना) असा सामना रंगणार आहे.
महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी पवार गटाच्या अर्चना घारे – परब या सुद्धा इच्छुक होत्या.ही जागा राष्ट्रवादी पवार गटाला मिळावी यासाठी त्यांचा व त्यांचा समर्थकांनी जोरदार प्रयत्न चालवले होते मात्र तेलींची उमेदवारी जाहीर झाल्याने नाराज झालेल्या अर्चना घारे – परब यांनी बंडाचे निशाण हाती घेत जोरदार शक्ती प्रदर्शन करत अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज परवा दाखल केला.तेव्हा दोघा बंडखोर अपक्ष उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे न घेतल्यास या मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे.
दरम्यान आज विशाल परब यांनी सावंतवाडीतील जगन्नाथराव भोसले उद्यानापासून मिरवणुकीने जात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
तत्पूर्वी झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी ‘आपण लढणार आणि जिंकणारही’ असा विश्वास व्यक्त केला.त्यांच्या समर्थनार्थ दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला या तिन्ही तालुक्यातून त्यांचे समर्थक,ग्रामस्थ मोठ्या संख्येने आले होते.
