विरार : विधानसभा निवडणुकीसाठी काही उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली असतानाही महाविकास आघाडीतील काही जागांचा तिढा अद्याप सुटला नव्हता. यामध्ये वसई आणि नालासोपारा मतदारसंघ कोणत्या पक्षाला मिळणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. अखेर विजय पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्याने वसईमध्ये काँग्रेसच मोठा भाऊ असल्याचे स्पष्ट झाले आहे. नालासोपारा मतदारसंघातून महाविकास आघाडी कुणाला तिकीट देणार, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.

महाविकास आघाडीमधून शिवसेना ठाकरे गटाने पालघर आणि बोईसर मतदारसंघामधून उमेदवारांची घोषणा केली होती. त्यामुळे वसई आणि नालासोपारा मतदारसंघातून काँग्रेसला उमेदवारी देण्यात येईल, असे संकेत मिळत होते. त्यानुसार काँग्रेसने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत विजय पाटील यांना स्थान देत त्यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे पुन्हा एकदा २०१९ प्रमाणेच वसईत हितेंद्र ठाकूर विरुद्ध विजय पाटील, असा सामना रंगणार आहे. मागील वेळी हितेंद्र ठाकूर हे २६ हजार मतांनी विजयी झाले होते. त्या वेळी शिवसेना महायुतीकडून उमेदवार राहिले होते. या वेळी पक्षबदल करत काँग्रेसमध्ये गेले आहेत.

महायुतीमधून अद्याप उमेदवाराचे नाव घोषित करण्यात आले नाही. त्याचप्रमाणे नालासोपाऱ्यामधून महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झालेली नसल्याने ठाकरे गट की काँग्रेस ही जागा लढवणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *