दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त

नवी मुंबई : “जीवनाच्या सर्व क्षेत्रात सच्चेपणा आणि कायद्याचे पालन करेन, लाच घेणार नाही आणि लाच देणार नाही, सर्व कामे प्रामाणिकपणे आणि पारदर्शक पध्दतीने करेन, जनहितासाठी कार्य करेन” अशी प्रतिज्ञा घेऊन भ्रष्टाचाराविरुध्द जनजागृती होण्याच्या उद्देशाने आज कोकण भवनमध्ये दक्षता जनजागृती सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला. विभागीय महसूल कार्यालयाच्या बैठक सभागृहात सकाळी ११ वाजता अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) संजीव पलांडे यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ दिली.
दरवर्षी ३१  ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात येते, त्या सप्ताहात दक्षता जनजागृती सप्ताह साजरा केला जातो. सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा आणि सत्यनिष्ठा याबद्दलच्या दृढनिश्चयाचे बळकटीकरण करण्यासाठी नागरिकांच्या सहभागाने हा सप्ताह साजरा करण्यात येतो. यंदाच्या २०२४ या वर्षी केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर  या कालावधीत या ‘दक्षता जनजागृती सप्ताहाचे’ आयोजन करण्यात आले आहे.
उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेतली. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन   यांनी   दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त जनतेला  दिलेल्या संदेशाचे वाचन केले. याप्रसंगी कोकण भवनमधील विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *