नवी मुंबई :
विधानसभा निवडणूक मतदार जागरुकता कार्यक्रमांतर्गत 150 ऐरोली व 151 बेलापूर या नवी मुंबईतील दोन विधानसभा मतदार संघ क्षेत्रात स्वीप कार्यक्रमांतर्गत मोठया प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये नमुंमपा आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वीपचे नोडल अधिकारी अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली नागरिकांपर्यंत पोहचून त्यांना मतदान करण्याकरीता प्रोत्साहित करण्यात येत आहे.
या अनुषंगाने 150 ऐरोली विधानसभा मतदार संघात सेक्टर 17 ऐरोली येथील पोस्ट ऑफिस मध्ये स्वीप पथकाने जाउुन तेथील अधिकारी, कर्मचारी व नागरिक यांचे मतदान करण्याविषयी प्रबोधन केले. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या राजमाता जिजाउु रुग्णालयातही डॉक्टर्स, नर्सेस, तेथील रुग्णालयीन कर्मचारी यांना भेटून मतदान विषयक जनजागृती करण्यात आली. त्याचप्रमाणे रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्याशीही संवाद साधून त्यांना मतदान करण्याविषयी आवाहन करण्यात आले. अशाचप्रकारे तुर्भे प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रातही स्वीप पथकाने भेट देउुन डॉक्टर, नर्सेस व इतर उपस्थितांना मतदान करण्याविषयी प्रोत्साहित केले.
घणसोली स्टेशन बाहेरील रिक्शा चालकांशीही सुसंवाद साधत त्यांना मतदान करण्याविषयी आवाहन करतानाच रिक्षावर मतदानाचा संदेश असलेले स्टीकर्स लावण्याविषयी सांगण्यात आले. ऐरोली येथे फटाका विक्रीच्या तात्पुरत्या स्वरुपातील स्टॉलला भेटी देउुन स्टॉल विक्रेते व ग्राहक यांनाही मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले.
अशाच प्रकारे 151 बेलापूर विधानसभा मतदार संघातही सेक्टर 25 समाजमंदिर सभागृह, जुईनगर, नेरुळ या ठिकाणी उपस्थित नागरिकांना 20 नोव्हेंबर रोजी मतदान करण्याचा आग्रह मतदानाचे महत्व सांगून करण्यात आला. त्याचप्रमाणे तुर्भे गाव सेक्टर 23 व सेक्टर 22 या ठिकाणी एनएसएस विद्यार्थ्यांची जनजागृतीपर मोठी रॅली काढण्यात आली व उपस्थितांना मतदान करण्याविषयी आवाहन करण्यात आले. सर्व ठिकाणी मतदानाची प्रतिज्ञा ग्रहण करण्यात आली.
