मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी वृंदातर्फे नुकतेच ताडदेव येथील जनता केंद्रामध्ये स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुंबई महापालिकेचे निवृत्त सह आयुक्त सुनील धामणे, बृहन्मुंबई महानगरपालिका पेन्शनर्स असोसिएशनतर्फे सर्वश्री डॉक्टर मारुती नलावडे, कार्यवाह, महादेव सोहनी, उपाध्यक्ष प्रतिमा पवार, संयुक्त कार्यवाह, शिवराम अधिकारी, संयुक्त कार्यवाह हे उपस्थित होते. दीप पूजन झाल्यानंतर रवी मोरे, श्रीमती अनुजा आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सेवानिवृत्त कर्मचा-यांनी कराओकेवर गाणी सादर केली. या कार्यक्रमात अपर्णा शेट्ये यांनी अतिशय बहारदार सूत्रसंचालन केले. त्यानंतर डॉ. गंगावणे यांच्याकडून कविता लेखनाचे विविध प्रकार उलगडून सोदाहरण सांगण्यात आले. डॉ. मारुती नलावडे यांनी कविता सादर केली. अशा नानाविध कार्यक्रमांनी हे स्नेहसंमेलन संपन्न झाले.
वामन कुरतडकर यांनी या कार्यक्रमाकरिता सभागृह उपलब्ध करून दिले. तसेच या कार्यक्रमाकरिता नामदेव थोरात, सुधीर शिशुपाल, शशिकांत गंगावणे. नवनाथ पाटील, प्रकाश नार्वेकर या सर्वांचे बहुमोल सहकार्य लाभले. सेवानिवृत्तांच्या अपेक्षा उंचावून हा कार्यक्रम संपन्न झाला.
