ठाण्यातील ८ विद्यार्थीनींचे पैसे मिळवून दिले परत
ठाणे : जनरल नर्सिंग कोर्स देण्याच्या नावाखाली सर्वसामान्य कुटुंबातील गरीब मुलींची फसवणूक करणाऱ्या ठाण्यातील बनावट सीईडीपी स्कील्ड इन्स्टिट्यूटला भाजपा महिला मोर्चाने धडा शिकविला आहे. फसवणूक झालेल्या ८ मुलींची १ लाख ६२ हजारांची रक्कम संस्थेने परत दिली आहे. या संस्थेवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सुरज दळवी, समर्थ नायक व नौपाडा मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघुले यांनी केली आहे.
सामान्य घरातील तरुण मुलींना लवकर रोजगार मिळवून देण्याचे आमिष दाखवून राममारुती रोडवरील सीईडीपी स्कील्ड इन्स्टिट्यूटने मुलींना प्रवेश दिले होते. प्रवेश घेताना महाराष्ट्रातील विद्यापीठाची अभ्यासक्रमाला मान्यता असल्याचे सांगण्यात आले. या अभ्यासक्रमाचे शुल्क म्हणून एका वित्तीय संस्थेकडून मुलींच्या कागदपत्रांची शहानिशा न करताच कर्ज मंजूर करुन संस्थेला दिले गेले. त्यानंतर या मुलींचे परराज्यातील बनावट विद्यापीठात प्रवेश करण्यात आल्यावर या प्रकाराला ८ मुलींनी आक्षेप घेतला. त्यांनी भाजपा मध्यवर्ती कार्यालयात तक्रार केली. त्यानंतर भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सुरज दळवी, समर्थ नायक, नौपाडा मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघुले, सरचिटणीस प्रशांत कळंबटे,गुलाब झा, कीर्ती शेट्टी, प्रसाद विश्वकर्मा,हिमांशू राजपूत यांनी इन्स्टिट्यूटमधील कर्मचाऱ्यांना जाब विचारला. त्यानंतर आठ मुलींनी प्रवेशावेळी जमा केलेली रक्कम १ लाख ६२ हजारांची रक्कम परत करण्यात आली.
या इन्स्टिट्यूटवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी भाजपा महिला मोर्चाने केली आहे. त्याचबरोबर अशा फसवणूक करणाऱ्या शैक्षणिक संस्थांची सातत्याने तपासणी करुन कारवाईचा आग्रह धरला आहे.
