वाशी : मराठा आरक्षण लढ्याचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक आणि विश्वासू सहकारी विनोद लक्ष्मण पोखरकर यांनी मंगळवारी अखेरच्या दिवशी ऐरोली विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पोखरकर यांनी भरलेला उमेदवारी अर्ज सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. अर्ज दाखल करतेवेळी त्यांनी लहान मुलांकडून गोळा करून आणलेली दहा हजार रुपयांची अनामत रक्कम म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांना दिली; परंतु वेळेअभावी निवडणूक अधिकाऱ्यांनी केवळ एक हजार रुपयांची नाणी स्वीकारून उरलेली रक्कम नोटांमध्ये स्वीकारली.
नवी मुंबई शहराचा सर्वांगीण विकास, मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी, तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा, स्त्रियांचे संरक्षण, अल्प उत्पन्न गटातील मुलांना केजी ते पीजीपर्यंत मोफत शिक्षण, नवी मुंबई शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आणि नागरिकांच्या कराच्या पैशांची चाललेली उधळण रोखण्यासाठी तसेच शहरातील स्थानिक भूमिपुत्र, मराठा समाजासह सर्वच जाती- धर्मातील लोकांना घेऊन एकत्र विकास करणे, हाच ऐरोली विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा माझा अजेंडा असल्याचे मत विनोद पोखरकर यांनी व्यक्त केले.
