सरवणकारांचा राज ठाकरेंवर ‘व्टिटर वार’
मंबई : बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी मला आपल्या नातेवाईकांसाठी सीट सोडायला सांगितलं नसतं. त्यांचे पन्नास नातेवाईक दादर – माहिम मधे राहतात पण उमेदवारी त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्याला दिली. ते कार्यकर्त्याची भावना जपणारे नेते होते, त्यांचे स्मरण करा अशी थेट व्टिटरवरून विनंती करत सदा सरवणकर यांनी राज ठाकरेंवर व्टिटर वार केला आहे.
एकनाथ शिंदे साहबांकडे पाहा त्यांचे सुपुत्र हे तीन वेळचे खासदार असताना सुद्धा त्यांनी आपल्या मुलाला केंद्रात मंत्री बनवले नाही, तर एका निष्ठावंत शिवसैकनिकाला ती संधी दिली. राजसाहेबांना मी विनंती करतो माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर अन्याय करू नका. मला आपले समर्थन द्या, असं सदा सरवणकर म्हणाले.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माहीमचे उमेदवार सदा सरवणकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स ( व्टिटर) वर एक पोस्ट करुन भावनांना वाट मोकळी करुन दिली. बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण करत सदा सरवणकर यांनी राज ठाकरेंना विनंती केली आहे. सदा सरवणकर यांनी बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दाखला देत सरवणकर यांनी हे आवाहन केलं.
सदा सरवणकर म्हणाले, मी चाळीस वर्षापासून शिवसेनचा कार्यकर्ता आहे. आम्ही आमच्या कष्टाने आणि घामाने तीन वेळा माहीमचा आमदार झालो. या मतदारसंघासाठी 30 वर्ष काम करतोय, या मतदारांशी जिव्हाळ्याचं नातं बनलं आहे. इथल्या मतदारांशी आईचं नातं आहे, ते तोडू नये, अशी विनंती आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी तीन वेळा निवडून आलेल्या खासदार मुलाला मंत्री न करता निष्ठावंत शिवसैनिकाला संधी दिली. तशीच भूमिका राज ठाकरेंनी घ्यावी, असं सदा सरवणकर म्हणाले. सर्वसामान्य शिवसैनिकाला आशीर्वाद द्यावेत, अशी विनंती करतो,असं सरवणकर म्हणाले. मतदारांच्या आग्रहामुळं या ठिकाणाहून माघार घेणं फार कठीण होत आहे, असं सरवणकर यांनी सांगितलं.
राज ठाकरेंनी सुनावले
“मी आदित्यसाठी विचार केला होता की माझ्याविरोधातला पक्ष असला तरी राजकारण आणि नातेसंबंध हे मी वेगळं बघतो. मी लहानपणापासून त्या विचारात वाढलोय. मला तेव्हा असं वाटलं की वरळीत आदित्यच्या समोर उमेदवार नको उभा करूयात. हा माझा विचार झाला. मी जसा विचार करतोय, तसा सूज्ञ समोरचाही विचार करेलच अशी मी अपेक्षा नाही धरत. मी ती गोष्ट चांगल्या विचारानं केली. समोरच्याला तसं वाटलं तर त्यांनी करावी, नाहीतर करू नये”, अशा शब्दात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि सदा सरवणकर यांना सुनावले.
“भाजपाला ही गोष्ट समजू शकते. पण सगळ्याच पक्षांना हे समजेल असं नाही. प्रत्येक पक्षाकडून ओरबाडण्याचे प्रयत्न चालू असतात. त्यांचं त्यांना ओरबाडू देत. आपण किती, कुणाला आणि काय काय सांगायला जायचं?” असंही राज ठाकरे म्हणाले.
