वर्तमान
नंदकुमार काळे
भारतीय जनता पक्षासारख्या केडरबेस पक्षाला पराभूत करायचे, तर विरोधी पक्षांमध्ये एकवाक्यता आणि जिंकण्याची विजिगिषू वृत्ती हवी. लक्ष्यभेद करण्याची व्यूहनीती आखता यायला हवी; परंतु महाविकास आघाडीतील पक्ष नियमित अंतराने स्वबळाची भाषा करतात. परस्परांचे पाय खेचतात आणि आपल्या मर्यादा लक्षात न घेता मागण्या करतात. हरियाणाच्या निकालांमधून त्यांनी काही बोध घेतला नाही, असे दिसते.
हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये समाजवादी पक्ष आणि आम आदमी पक्षाला एकही जागा न दिल्याचा परिणाम काँग्रेसला भोगावा लागला. काँग्रेस बॅकफूटवर गेली असली, तरी त्यातून धडा घ्यायला तयार नाही. सत्ता मिळवायची असेल, तर सर्वच मित्रांनी थोडा त्याग करण्याची आवश्यकता असते; परंतु लोकसभेतील यशाने फाजील आत्मविश्वास अनुभवणाऱ्या काँग्रेसला महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद आपल्या हाती आले, असे वाटायला लागले आहे. काँग्रेस पक्ष सत्ताधारी पक्षाऐवजी मित्रपक्षाचेच अवकाश व्यापण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातून मित्रपक्षाबाबत संदेह निर्माण होईल, असे वातावरण उभे रहाते. वास्तविक, अशा प्रकारचे वातावरण मित्रपक्षाविरोधात केले, तर त्याचा दबाव म्हणून काँग्रेसला फायदा होईल; परंतु मित्रपक्षाचे नुकसान होऊन, अंतिम चुरशीच्या लढाईत ‘इंडिया’ आघाडीचे नुकसान होईल, एवढे साधे गणित पक्षाच्या धुरिणांना कळत नाही. एखादा भाग या पक्षाचा बालेकिल्ला असू शकतो. याचा अर्थ त्या भागातील एकही जागा मित्रपक्षांना द्यायची नाही, असे नाही. एकीकडे महायुतीत किती तरी वाद असताना या वादावर पडदा पडून अंतिमतः जागावाटप निश्चित करण्यात आले. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात महायुतीने आघाडी घेतली; परंतु महाविकास आघाडीच्या बैठकांमागून बैठका होऊनही जागावाटपाचा घोळ घातला गेला. शिवसेनेच्या ठाकरे गटानेही हरियाणातील पराभवानंतर काँग्रेसला कस्पटासमान तुच्छ लेखायला सुरुवात केली. लोकसभेला सांगलीच्या जागेबाबत केला, तसाच अडेलतट्टूपणा विधानसभेच्या निवडणुकीतही केला. अशा घटनांमुळे इंडिया आघाडीमधला विसंवाद सतत समोर येत आहे.
विधानसभेच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब झाले नसताना अन्य पक्षातील उमेदवार आयात करून त्याचे नाव जाहीर करण्याची घाई उद्धव ठाकरे यांनी अलिकडे केली. वास्तविक, शरद पवार यांचे आणि गणपतराव देशमुख यांचे अतिशय चांगले संबंध होते. गणपतराव फक्त एकदाच सांगोला विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाले. सर्वाधिक वेळा ते तिथे निवडून आले. अतिशय साधे आणि अभ्यासू आमदार म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनानंतर आता तिथून त्यांचे चिंरजीव निवडणुकीसाठी इच्छुक होते. त्यांना ती जागा सोडण्याऐवजी अजित पवार गटातील दीपक साळुंके यांना घेऊन शिवसेनेने त्यांची उमेदवारी जाहीर केली. जागावाटपाअगोदर शिवसेनेने त्यांच्या उमेदवारांना एबी फॉर्मही दिले. महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्षाचे अस्तित्त्व हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या मतदारसंघात असताना दुसरीकडे त्यांच्याच बालेकिल्ल्यातील जागा शिवसेना परस्पर जाहीर करत असल्याने महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडली आणि शेतकरी कामगार पक्षाने 12 जागा लढवण्याची घोषणा करून टाकली. त्यामुळे महाविकास आघाडी एकसंघ नाही आणि ती एकसंघपणे विधानसभा निवडणुकीला सामोरी जाऊ शकत नाही, हे चित्र दुर्दैवाने पुढे आले.
निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी महाराष्ट्र आणि झारखंडमधील ‘इंडिया’ आघाडीत फूट पडताना दिसत आहे. या दोन्ही राज्यांमध्ये आघाडीमध्ये जागावाटपावर खऱ्या अर्थाने एकमत झाल्याचे दिसले नाही. झारखंडमध्ये राष्ट्रीय जनता दलाने काँग्रेस-झारखंड मुक्ती मोर्चाच्या अडचणी वाढवल्या आहेत. त्याच वेळी, समाजवादी पक्षाच्या महाराष्ट्रातील आग्रहामुळे जागावाटपाचा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा 41 जागांवर तर काँग्रेस 29 जागांवर निवडणूक लढवणार आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी राष्ट्रीय जनता दलाची अवघ्या सात जागांवर बोळवण केल्यामुळे राष्ट्रीय जनता दल नाराज झाला. तेजस्वी यादव यांनी झारखंडमध्ये स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा इशारा दिला. पक्षाचे राज्यसभा खासदार मनोज झा म्हणाले, सर्व पक्षांचे नेते रांचीमध्ये उपस्थित असतात, तेव्हा आम्हाला युती स्थापनेच्या प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आले नाही याचे दुःख होत आहे. आमच्यासमोर अनेक पर्याय खुले आहेत. महाराष्ट्रातही विरोधी महाविकास आघाडीतील जागावाटपाचा फॉर्म्युला बरेच दिवस आकाराला आला नाही. काँग्रेस, शिवसेना (यूबीटी) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (एसीपी) यांच्यामध्ये जागावाटपाबाबत अनेक बैठका झाल्यानंतरही प्रकरण चिघळले आणि ताण वाढत गेला.
त्याच वेळी समाजवादी पक्षाने महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडे बारा जागांची मागणी केली. पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी धुळे विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी परस्पर जाहीर केली. यानंतर राज्यात जागावाटपावरून वाद होण्याची शक्यता निर्माण झाली. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट आपल्या जागा अखिलेश यादव यांना देऊ इच्छित नाहीत. दोन्ही राज्यांमध्ये जागावाटपाबाबत शेवटच्या क्षणापर्यंत चर्चा सुरु राहण्याची शक्यता असल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे होते. हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, अशी सर्व पक्षांची इच्छा दिसली; मात्र प्रत्यक्षात तसे घडले नाही. झारखंड आणि महाराष्ट्र निवडणुकीत जागावाटपात विरोधी आघाडीच्या पक्षांमध्ये एकमत नाही. काँग्रेससोबतच समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागांची मागणी करत राहिले. झारखंडमध्ये काँग्रेस, झामुमो आणि राजद यांच्यामध्ये सारे काही आलबेल नव्हते. झारखंडमध्येही ‘इंडिया’ आघाडीच्या मित्रपक्षांमध्ये जागावाटपावर चर्चेचे गुऱ्हाळ होत राहिले. सध्या राज्यात हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार सत्तेवर आहे, तर बिहारमध्ये मजबूत पकड असलेला पक्ष राष्ट्रीय जनता दल झारखंडमध्ये एकट्याने निवडणूक लढवू शकतो. काँग्रेस झमुमोसोबत जागावाटपावर सातत्याने चर्चा करत आहे; पण झामुमो आणि काँग्रेस राजदला हव्या त्या जागा देण्यास तयार नसल्याची चर्चा आहे.
देशातील परिस्थिती लक्षात घेता मोठ्या उद्दिष्टांसाठी एकत्र येणे आवश्यक आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते झा म्हणाले की त्यांचा पक्ष इंडिया आघाडीमध्ये 12-13 पेक्षा कमी जागा स्वीकारु शकत नाही. झारखंडमध्ये 18-20 जागांवर या पक्षाचा पाया मजबूत आहे. असे असले, तरी राष्ट्रीय जनता दलाने अजूनही सावध भूमिका घेतली आहे. राष्ट्रीय जनता दल ‘इंडिया’ आघाडी कमकुवत होऊ देणार नाही आणि शेवटच्या क्षणापर्यंत समझोता करण्याचा प्रयत्न करेल, असेही झा म्हणाले. हरियाणानंतर काँग्रेसची प्रतिष्ठा कमी झाली, लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्ष पुन्हा आघाडी करण्याला अनुकूल दिसला; मात्र हरियाणातील अनपेक्षित पराभवानंतर काँग्रेसचा प्रभाव ओसरला. काँग्रेसचे मित्रपक्षही त्यांच्याविरोधात बोलू लागले. हरियाणातील निकालानंतर महाराष्ट्रातील त्यांचा मित्रपक्ष शिवसेना (उद्धव गट) म्हणाली होती की काँग्रेस एकट्याने निवडणूक लढवते, तिथे चांगली कामगिरी करत नाही. हरियाणाच्या निकालानंतर काँग्रेस जागावाटपाच्या मुद्द्यावरही पुढे येऊ शकलेली नाही. त्यांचे मित्रपक्ष काँग्रेसकडे अधिक जागांची मागणी करत आहेत. एकूणच ‘इंडिया’ आघाडीतील मित्रपक्षांमध्ये खोल दरी दिसून येत आहे. महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुका असोत किंवा 8 राज्यांच्या विधानसभा पोटनिवडणुका; जागावाटपाचा वाद थांबत नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रत्येक राज्यातल्या काही जागा ‘इंडिया’ आघाडीच्या मित्रपक्षांनी थेट आपल्या प्रतिष्ठेशी जोडल्या आहेत. पहावे तिकडे जागांसाठी सौदेबाजी सुरू आहे.
राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्ष युती करून निवडणूक लढवण्याचा दावा करत आहेत, आश्वासने देत आहेत; मात्र मध्य प्रदेशात त्यांची युती तुटताना दिसत आहे. महाराष्ट्रासाठी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक रविवारी संध्याकाळी होणार होती; परंतु काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी करवा चौथसह विविध कारणे सांगितली, त्यानंतर बैठक पुढे ढकलण्यात आली. आता मध्य प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने बुधनी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवार जाहीर केला आहे. मध्य प्रदेशमधील बुधनी आणि विजयपूर या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होत असून 13 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने दोन्ही जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. दरम्यान, समाजवादी पक्षाने अर्जुन आर्य यांना बुधनीमधून उमेदवारी जाहीर केली. अर्जुन आर्य यांनी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिवपदाचा राजीनामा देऊन समाजवादी पक्षात प्रवेश केला. काँग्रेसने माजी मंत्री राजकुमार पटेल यांना बुधनीमधून उमेदवार केले आणि ही यादी आल्यानंतर काही वेळातच समाजवादी पक्षाने आर्य यांना उमेदवारी जाहीर केली. दुसरीकडे, तेजस्वी यादव दोन दिवस रांचीमध्ये राहिले; पण सोरेन यांनी त्यांची भेटही घेतली नाही. त्यामुळे राष्ट्रीय जनता दल नाराज झाला. अशी बेदिली असताना ‘इंडिया’ आघाडी भाजपशी देशात दोन हात कसे करणार, हा प्रश्नच आहे.
(अद्वैत फीचर्स)