मनसैनिकांचे अकोल्यात खळखट्टयाक; पक्षाचीच शाखा फोडली
अकोला : विधानसभा निवडणुकांसाठी मनसेप्रमुख राज ठाकरे जीवाचे रान करीत असतानाच मनसेच्या कर्जत आणि अकोल्यातील उमेदवारांनी स्वपक्षाशीच दगाफटका केल्याने मनसैनिकात जबरदस्त संतापाची लाट उसळली असून अकोल्यात मनसैनिकानी संतापातून दगाफटका करणाऱ्या उनेदवाराच्या शाखा फोडली आहे. अकोल्यात मनसे उमेदवार प्रशंसा अंबेरे यांनी जाणीवपुर्वक आपले वय कमी लावले त्यामुळे त्यांचा अर्ज बाद झाला. तर कर्जतचे उमेदवार जे.पी.पाटील अर्ज दाखल करण्यास उशीरा पोहचल्यामुळे त्यांना अर्ज भरता आला नाही. उमेदवारांच्या या दगाफटक्यामुळे या दोन्ही मतदारसंघात मनसेचे इंजिन सुरू होण्याआधी थांबले .
या घटनेनंतर, दोन्ही जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा असून, आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोपही संबंधित उमेदवारांवर केला जात आहे. त्याच , संतापतून अकोल्यात मनसैनिकांकडून स्वपक्षाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मनसेच्या उमेदवार प्रशंसा अंबेरे यांचं अर्जाच्या छाननीत वय २५ दिवसांनी कमी असल्यामुळे त्यांचा अर्ज फेटाळला गेला होता. त्यामुळे, मनसे पक्षाकडून आता त्यांच्यावर काय कारवाई केली जाते हे पहावे आहे.
अकोल्यातील डाबकी रोड भागातल्या आठवडी बाजार चौकात अंबेरे यांचं कार्यालय आहे. अंबेरे यांनी विरोधी उमेदवारांशी हातमिळवणी करून जाणीवपूर्वक आपलं वय कमी असल्याची बाब लपवल्याचा आरोप आता मनसेच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. मनसेचे शहर उपाध्यक्ष अविनाश मुरेकर आणि इतर कार्यकर्त्यांनी कार्यालयात घुसून ही तोडफोड केल्याची माहिती आहे.
दरम्यान, वेळेचे महत्त्व न कळल्यामुळे मनसेचा उमेदवार कर्जत-खालापूर मतदारसंघातून अर्ज दाखल करण्याच्या संधीला मुकला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे. पी. पाटील यांना कर्जतमधून उमेदवारी दिली होती. अर्ज दाखल करण्यासाठी दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत होती. तोपर्यंत ते एबी फॉर्म घेऊन निवडणूक कार्यालयात न पोहोचल्याने त्यांच्या हलगर्जीपणामुळे महाराष्ट्र सैनिकांचा प्रचंड हिरमोड झाला आहे.
जे. पी. पाटील निष्ठावंत असल्याने त्यांना उमेदवारी देण्यात आली. ते अर्ज भरायला निघाले तेव्हा त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, तालुकाध्यक्ष अजित सावंत, संजय तन्ना, मितेश शहा, विनित मोडक यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. अर्ज दाखल करण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांना दुपारी 2.45 पर्यंत येण्याचे आवाहन निवडणूक अधिकाऱ्यांनी वारंवार करूनही जे. पी. पाटील 2 वाजून 55 मिनिटांनी पोहोचले. तोपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया बंद झाल्यामुळे पाटील अर्ज दाखल करू शकले नाहीत. उमेदवारी मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. असे असतानाही जे. पी. पाटील यांना संधी मिळूनही ते उमेदवारी अर्ज वेळेत का भरू शकले नाहीत, याची अर्थपूर्ण चर्चा सध्या मनसेमध्ये सुरू आहे.