नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील कच्छमध्ये भारतीय सैन्यातील जवानांसोबत दिवाळीचा सण साजरा केला. दरवर्षीप्रमाणे यंदाही पंतप्रधान मोदींनी दिवाळीत जवानांसोबत वेळ घालवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पंतप्रधान मोदी यांना ११ व्या वेळी जवानांसोबत दिवाळी साजरी केली. पंतप्रधान मोदींनी कच्छमध्ये भारतीयजवानांसोबत दिवाळी साजरी करताना त्यांना मिठाई खाऊ घातली. देशाची सेवा केल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी येथील सैनिकांचे आभार मानले आणि अनेक मोठ्या गोष्टी सांगितल्या. आमचं सरकार एक इंचही जमिनीबाबत तडजोड करत नाही, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील कच्छमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली. त्यांनी स्वतःच्या हाताने सैनिकांना मिठाई खाऊ घातली. यावेळी पंतप्रधान मोदींनी जवानांना संबोधित केले. सीमाभागातील पायाभूत सुविधांचा विकास करणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. आम्ही शत्रूच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही तर आमच्या सैन्याच्या ताकदीवर विश्वास ठेवतो. तुमच्यामुळे हा देश सुरक्षित आहे, असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी दिवाळीला सीमेवर जाऊन जवानांसोबत सण साजरा करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमा सुरक्षा दल, लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. बीएसएफच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, एकता नगरहून कच्छमधील कोटेश्वरला पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी सर क्रीक भागातील लक्की नाल्यात पोहोचले होते.

“आज जेव्हा आपण विकसित भारताच्या ध्येयाकडे वेगाने वाटचाल करत आहोत, तेव्हा तुम्ही सर्वजण या स्वप्नाचे रक्षक आहात. आम्ही शत्रूच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही तर देशाचे रक्षण करण्यासाठी असलेल्या आमच्या सैन्याच्या ताकदीवर विश्वास ठेवतो. तुमच्यामुळे आपला देश सुरक्षित आहे असे भारतातील जनतेला वाटते. सीमावर्ती भागात पायाभूत सुविधांचा विकास करणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे,” असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.

“नौदल आणि हवाई दलाला स्वतंत्र दल म्हणून पाहिले जाते, पण जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा त्यांची ताकद अनेक पटींनी वाढते. भारत आपल्या सीमेच्या एक इंचभरही तडजोड करू शकत नाही, म्हणूनच आमची धोरणे आमच्या सशस्त्र दलांच्या संकल्पाशी सुसंगत आहेत,” असंही यावेळी पंतप्रधान मोदींनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *