१,०३२ गुन्हेगारी व्यक्तींना प्रतिबंधात्मक नोटीस

 

कर्जत : आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व मतदान केंद्रावर मतदान सुरळीतपणे पार पडावे यासाठी पोलिस प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण झाली असून मतदारांनीदेखील शंभर टक्के मतदान करावे असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी केले आहे.
यावेळी पत्रकारांना माहिती देताना वाखारे म्हणाले की, कर्जत उपविभाग अंतर्गत येणाऱ्या कर्जत, मिरजगाव, श्रीगोंदा, बेलवंडी, जामखेड व खर्डा या सर्व पोलिस ठाण्याअंतर्गत पोलिस प्रशासनाच्या तयारीच्या कामाचा आढावा घेतला आहे. मतदान सुरळीत आणि शांततेने पार पडावे यासाठी कर्जत उप विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलिस ठाण्यांमधून गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्या १,०३२ गुन्हेगारी व्यक्तींना प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर कारवाईची प्रक्रियादेखील सुरू आहे.
सर्व ठिकाणी संचालन
उपविभागातील कर्जत, मिरजगाव, श्रीगोंदा बेलवंडी, जामखेड व खर्डा या ठिकाणी पोलिस व राखीव दलाच्या पोलिस तुकड्यांच्या माध्यमातून संवेदनशील भागांसह सर्वत्र पोलिस पथकाने संचलन केले आहे. या माध्यमातून नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे, तसेच अनुचित प्रकार करणाऱ्यांना या माध्यमातून इशारा देण्यात आला आहे. सर्वांनी शासनाच्या नियमाप्रमाणे आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. सोशल मीडियाचा वापर करताना कोणत्याही प्रकारे भावना दुखावतील अशा पद्धतीचे वर्तन असू नये. कोणतीही आगळीक करण्याचा कोणी प्रयत्न केला तरीदेखील त्याची गय केली जाणार नाही, असे वाखारे म्हणाले.
मतदानाची टक्केवारी वाढावी
मतदान करणे हे पवित्र कार्य आहे आणि प्रत्येक नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा. सध्या दिवाळीचा सण आहे, नागरिकांनी आनंदाने व शांततेने सण साजरा करावा. फटाके फोडताना काळजी घ्यावी, आनंदावर विर्जण पडणार नाही अशा पद्धतीचं सर्वांचे वर्तन असावे. आपल्या किमती वस्तू, मालमत्ता यांचे सर्वांनी संरक्षण करावे. गर्दीमध्ये जाताना महिलांनी काळजी घ्यावी. दीपावलीच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देत, वाखारे यांनी असे आवाहन केले आहे. यावेळी पोलिस निरीक्षक मारुती मुळक हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *