माथेरान : कस्तुरबा रोडवरील हॉटेल मेघदूत शेजारील वनखात्याच्या रिक्त प्लॉटवर जवळपास वीस गुंठे जागेवर अतिक्रमण करून जागा  बळकावण्याचा प्रयत्न वनखात्याच्या कार्यतत्पर अधिकारी वर्गाने हाणून पाडला आहे.

माथेरान मध्ये नगरपरिषदेच्या सभागृहात लोकप्रतिनिधी नसल्याने मागील तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळेच याठिकाणी राजकीय लोकांच्या आशीर्वादानेच अतिक्रमणाचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. माथेरान बाहेरील मंडळी इथे पोट भरण्यासाठी आलेली असून स्वतःचीच जागा असल्याचा अविर्भाव आणून वनखात्याच्या जागांवर  बिनदिक्कतपणे अतिक्रमणे करून जागा हडप करत आहेत.यातील काही ठिकाणी वनखात्याच्या अधिकारी वर्गाकडून आणि वन समितीच्या पदाधिका-यांनी काही अतिक्रमणे उध्वस्त केल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.कस्तुरबा रोडवरील अद्यापही काही ठिकाणी वनखात्याच्या लाखो रुपये किंमतीच्या जागा मोठया प्रमाणात लाटलेल्या आहेत त्या सर्व जागा ताब्यात घेणे आवश्यक असल्याचे नागरिक बोलत आहेत. पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असणाऱ्या भूमीपुत्रांनी थोडेफार बांधकाम केले की ताबडतोब कारवाईचा बडगा उगारला जातो आणि जी मंडळी इथे पोट भरण्यासाठी आलेली आहेत त्यांनी तर वस्तीच्या ठिकाणी तसेच आजूबाजूच्या मोकळ्या जागेत जंगले उध्वस्त करून झोपडया उभारल्या आहेत.त्यामुळेच इथली वनराई संपुष्टात आल्याने थंड हवेच्या माथेरान मध्ये उष्मां जाणवत आहे. मुख्य महात्मा गांधी मार्गावर सुध्दा अनेक हॉटेल धारकांनी वनखात्याच्या जागा बळकावून त्याठिकाणी हॉटेलच्या दर्शनी भागात पर्यटकांना बसण्यासाठी तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी साहित्य ठेवले आहे. आजपर्यंत या भागात वनखात्याच्या मार्फत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. निदान या हॉटेल धारकांकडून वार्षिक भाडे आकारल्यास वनखात्याच्या तिजोरीत भर पडू शकते.राजकीय मंडळी स्वतःच्या स्वार्थासाठी शासनाच्या जागांवर अतिक्रमण करण्यास मुभा देत आहेत अशा राजकारण्यांवर शासनाने कठोर कारवाई करावी अशीही मागणी जोर धरू लागली आहे.

——————————————————-

कस्तुरबा रोड वरील अनेक हॉटेल वाले माथेरान मधील प्रतिष्ठित राजकारणी लोकांना हाताशी धरून आपल्या हॉटेल, बंगला शेजारील वनखात्याचे राखीव प्लॉट अतिक्रमण करून आपल्या प्रॉपर्टीला जोडत आहे, वनखात्याने अतिशय तत्परतेने यावर यापूर्वी हॉटेल साईबानं ,हॉटेल पार्क व्ह्यू व आता हॉटेल मेघदूतच्या बाजूच्या वनविभागाच्या जागेवरील अतिक्रमणवर कारवाई केली आहे.या कारवाई मध्ये माथेरान मधील जागरूक नागरिकांचा महत्वाचा वाटा आहे.

योगेश जाधव —-अध्यक्ष, वन व्यवस्थापन समिती माथेरान

——————————————————-

ज्याठिकाणी वनखात्याच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे.ते लाकडे आणि पत्रे संबंधित अधिकारी वर्गाने ताबडतोब जमा करून घ्यावीत.या महात्मा गांधी मार्ग आणि कस्तुरबा रोडवरील भागात ज्या ज्या ठिकाणी अशाप्रकारे अतिक्रमण झाली आहेत. त्या जागा सुध्दा ताब्यात घेऊन जागा बळकवणाऱ्या संबंधीतांवर कडक कारवाई करण्यात यावी.

वसंत कदम—सामाजिक कार्यकर्ते माथेरान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *