येवला, दिंडोरी आण्िा सिन्नरमध्ये रंगणार राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत लढत
नाशिक : जिल्ह्यात शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यांची तीन विधानसभा मतदारसंघांत आमनेसामने लढत रंगणार आहे. दोन मतदारसंघांमध्ये काकांचा पक्ष भाजपसोबत भिडणार आहे. शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटातही दोन मतदारसंघांत आमनेसामने लढाई रंगणार आहे.
एकीकडे बंडोबांना शांत करण्यासाठी उमेदवारांसह राजकीय पक्षांनी प्रयत्न सुरू केले असले, तरी जिल्ह्यातील १५ मतदारसंघांमधील लढती कशा रंगणार याचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात जागावाटपात महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार गट आणि महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट मोठे भाऊ ठरले आहेत. नाशिक जिल्ह्यात निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे. अर्ज दाखल झाल्यानंतर आता माघारीची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यात विधानसभेच्या १५ जागा असून, जवळपास ३३६ उमेदवारांनी निवडणूक लढण्यासाठी अर्ज दाखल केलेले आहेत. यंदा अपक्ष आणि बंडखोरांची संख्या वाढल्याने राजकीय पक्षांचीही डोकेदुखी वाढली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील बंडानंतर पक्षांची संख्या वाढली असली, तरी इच्छुकांना निवडणुकीचे घुमारे फुटले आहेत.
जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीत अनेक ठिकाणी बंडखोरीही पाहायला मिळत आहे. मात्र, तरीही महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार गट जिल्ह्यात सर्वाधिक सात जागांवर निवडणूक लढवत आहे, तर पाठोपाठ भाजप पाच जागांवर लढत आहे. शिवसेना शिंदे गटाकडून दोन जागांवर उमेदवार देण्यात आले आहेत. महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट मोठा भाऊ ठरला असून, ठाकरे गटाने सहा ठिकाणी उमेदवार दिले आहेत. ‘राशप’ पाच जागांवर उमेदवारी करीत आहे, काँग्रेसला तीन, तर मित्रपक्ष ‘माकप’च्या वाट्याला एक जागा आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांतील लढतीचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यानुसार पवार-काका पुतण्यांमध्ये येवला, दिंडोरी आणि सिन्नर या ठिकाणी आमनेसामने लढत होत आहे. नाशिक पूर्व आणि बागलाणमध्ये भाजप विरुद्ध ‘राशप’चा सामना होणार आहे.
जिल्ह्यातील लढती अशा…
देवळाली- राष्ट्रवादी (अजित पवार ) विरुद्ध शिवसेना (ठाकरे गट) गट दिंडोरी ‘राशप’ विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार गट)
येवला- ‘राशप’ विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार गट) सिन्नर- ‘राशप’ विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार गट) बागलाण- भाजप विरुद्ध ‘राशप’ चांदवड- भाजप विरुद्ध काँग्रेस
निफाड- राष्ट्रवादी (अजित पवार गट) विरुद्ध शिवसेना (ठाकरे गट)
नांदगाव- शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध शिवसेना (ठाकरे गट)
नाशिक पूर्व भाजप विरुद्ध ‘राशप’ नाशिक मध्य- भाजप विरुद्ध शिवसेना (ठाकरे गट) नाशिक पश्चिम भाजप विरुद्ध शिवसेना (ठाकरे गट)
इगतपुरी- राष्ट्रवादी (अजित पवार गट) विरुद्ध काँग्रेस मालेगाव बाह्य शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध शिवसेना (ठाकरे गट) मालेगाव मध्य- काँग्रेस विरुद्ध ‘एमआयएम’
कळवण- माकप विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार गट).
शिंदे-ठाकरेंचा दोन ठिकाणी सामना
महाविकास आघाडीत ठाकरे गट सहा जागा लढत असला, तरी शिवसेना शिंदे गटाशी ठाकरे गटाचा दोन मतदारसंघांतच सामना होत आहे. नांदगाव, मालेगाव बाह्य या दोन ठिकाणी ठाकरे विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेत लढत होत आहे. त्यातही नांदगावात आता शिंदेच्या शिवसेनेची लढत ठाकरे गटाऐवजी अपक्ष उमेदवार समीर भुजबळांशी होत आहे. ‘मालेगाव बाह्य’ मध्ये शिंदेच्या शिवसेनेचे दादा भुसे आणि ठाकरे गटाचे अद्वय हिरे यांच्यात लढत होत आहे. भाजप आणि शिवसेना ठाकरे गट नाशिक पश्चिम व नाशिक मध्य या दोन मतदारसंघांत एकमेकांसमोर आले आहेत.