मुंबई : महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिवाळीनिमित्त दादर येथील कासारवाडी परिसरातील महानगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहतीला सपत्नीक सदिच्छा भेट दिली. मुंबईच्या दैनदिन स्वच्छतेत मोलाचे योगदान देणाऱ्या सफाई कर्मचारांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे आयुक्तांनी आभार मानले व त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच महापालिका आयुक्तांनी सफाई कामगारांबरोबर दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी दिवाळीचा फराळही केला. दीपावलीनिमित्त कासारवाडी भागातील वसाहतीला भेट दिल्याबद्दल सफाई कर्मचार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आयुक्तांचे आभार मानले. गगराणी यांनी यावेळी कासारवाडी परिसरातील स्वच्छता आणि इतर सोयी-सुविधांबाबत समाधान व्यक्त केले.
गेल्याच आठवड्यात गगराणी यांनी सफाई कामगारांशी संवाद साधला होता. मुंबईतील रस्ते, गल्ल्यांच्या स्वच्छतेचे काम करणाऱ्या सफाई कामगारांशी पालिका आयुक्तांनी संपर्क साधण्याची ही पहिलीच वेळ होती. यावेळी आयुक्तांनी कामगारांच्या कामाचे कौतुक केले होते. तसेच स्वच्छता करताना मुखपट्टी (फेस मास्क) , हातमोजे, रिफ्लेक्टिव्ह जॅकेट, गम बूट आदी सुरक्षा साधनांचा वापर करावा. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या विविध अडीअडचणी सोडविण्यासाठी महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध आहे, असेही आश्वासन आयुक्तांनी यावेळी दिले होते. कोणतीही वारसाहक्क/अनुकंपा प्रकरणे प्रलंबित राहणार नाहीत, या अनुषंगाने तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश गगराणी यांनी यावेळी दिले होते.