मुंबई : राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांत एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची तपशीलवार माहिती सादर करण्याचे निर्देश वैद्यकीय महाविद्यालये आणि संस्थांना दिले आहेत. विद्यार्थ्यांचे प्रवेश नियमानुसार झाले आहेत का ? वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश क्षमता, विद्यार्थ्यांची पात्रता, वयोमर्यादा, पात्रता गुण आदी बाबींचे काटेकोरपणे पालन करण्यात आले आहे का ? हे तपासण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने वैद्यकीय महाविद्यालये व संस्थांना वरील आदेश दिले आहेत. वैद्यकीय महाविद्यालयांना या विद्यार्थ्यांची तपशीलवार माहिती ८ नोव्हेंबरपर्यंत सादर करावी लागणार आहे.
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या कायद्याच्या तरतुदींनुसार आणि पदवीधर वैद्यकीय शिक्षण नियम २०२४ द्वारे अधिसूचित राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) आधारित प्रक्रियेनुसार निवड करणे आवश्यक असते. त्यासाठी महाविद्यालयांची मंजूर प्रवेश क्षमता, पात्रता, वयोमर्यादा, पात्रता गुण, समुपदेशन आदी मानके निश्चित करण्यात आली आहेत. या मानकांनुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली आहे का ? हे तपासण्यासाठी प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांची इयत्ता बारावीची गुणपत्रिका, नीट परीक्षेचा निकाल, आकारण्यात आलेल्या शुल्काचा तपशील याचबरोचर महाविद्यालयांमधील जागा, महाविद्यालयाची श्रेणी, अल्पसंख्याक, जागांचा तपशील, खाजगी महाविद्यालयांच्या बाबतीत सहमती करार आदी तपशील सादर करण्याचे आदेश राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने सर्व वैद्यकीय महाविद्यालये व संस्थांना दिले आहेत.
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने वैद्यकीय प्रवेश नियमानुसार एमबीबीएसच्या प्रवेशांवर लक्ष ठेवण्यासाठी ऑनलाईन प्रणाली सुरू केली आहे. या ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा तपशील युनिक लॉगिन आयडीद्वारे ८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सादर करण्याच्या सूचना आयोगाने सर्व वैद्यकीय महाविद्यालये व संस्थांना दिल्या आहेत. मात्र त्यानंतर कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालय व संस्थांना विद्यार्थ्यांचे तपशील सादर करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने स्पष्ट केले आहे. ऑनलाईन माध्यमातून सादर केलेल्या या तपशीलाची राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग पडताळणी करण्यात येते. यामध्ये काही गैरप्रकार आढळल्यास संबंधित महाविद्यालयावर कारवाई करण्यात येते.
कोणते तपशील मागण्यात आले आहेत
इयत्ता १२ वीची गुणपत्रिका, स्पर्धात्मक प्रवेश परीक्षेचा तपशील, नीट परीक्षेचा हजेरी क्रमांक, राज्य कोटा, केंद्रीय कोटा, एनआरआय कोटा, प्रवेश घेतल्याची तारीख, जातीचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे मागवण्यात आली आहेत. तर परदेशी विद्यार्थ्यांची इयत्ता बारावीची गुणपत्रिका, भारतीय विद्यापीठांच्या असोसिएशनने जारी केलेले समतुल्य प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.