डोंबिवली : उत्सवी रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवली पूर्वेतील फडके रस्त्यावर सण, उत्सवांच्या काळात मोठ्या आवाजात डीजेवर गाणी, ढोलताशांचे वादन केले जाते. सण, उत्सव काळात होणाऱ्या या दणदणाटाने फडके रस्ता भागात राहणारे रहिवासी, रुग्णालय चालक, व्यापारी त्रस्त झाले आहेत.
गुरुवारी फडके रस्त्यावर ढोलताशा वादनास चेंंगराचेंगरीचे कारण देत पोलिसांनी बंदी घातली होती. दिवाळी सणाच्या दिवशी फडके रस्त्यावर ढोलताशांचे वादन ही पूर्वपरंपार प्रथा आहे. त्यामुळे राजकीय मंडळींनी हस्तक्षेप केल्यानंतर पोलिसांनी ढोलताशा वादनास पथकांना आवाजाची मर्यादा पाळून वादन करण्यास टिळक रस्त्यावर परवानगी दिली होती. यापूर्वी ढोलताशा वादनास परवानगी नाकारल्याने मोजकीच पथके गुरुवारी वादनास हजर होती.
फडके छेद रस्त्यावरील टिळक रस्त्यावरील ब्राह्मण सभा भागात या पथकांनी गुरुवारी दिवाळीच्या पहिल्या दिवशी वादन केले. हे वादन पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळते. ढोलताशांचे वादन गुरुवारी दोन ते तीन तास चालू होते, असे टिळक रस्त्यावरील सोसायट्यांमधील अनेक रहिवाशांनी सांगितले. या दोन ते तीन तासाच्या कालावधीत या भागाती शांतता भंग पावली होती. घरात रुग्ण, लहान बाळे असतात. त्यांना मर्यादे पलीकडचा आवाज सहन होत नसतो. असे असताना या दणदणाटामुळे आम्ही रहिवासी खूप अस्वस्थ होतो, असे रहिवाशांनी सांगितले.
सण, उत्सव असला की उत्सवी कार्यक्रम फडके रस्त्यावर होतात. याठिकाणी यापूर्वी शांततेत कार्यक्रम पार पडत होते. शेकडो नागरिक या उत्सवी कार्यक्रमात सहभागी होत होते. त्यावेळी कोणालाही कसलाही त्रास होत नव्हता. गेल्या काही वर्षापासून उत्सवी कार्यक्रमांच्यावेळी डीजेवरची गाणी, ढोलताशा पथकांचा गजर फडके रस्त्यावर सुरू झाल्यापासून या भागातील शांततेचा भंग होण्यास सुरुवात झाली आहे, असे रहिवाशांनी सांगितले.
ढोलताशा वादन ही एक कला आहे. या पथकांनी फडके रस्त्याच्या विविध भागात आवाजाची मर्यादा पाळून ढोलताशा वादन केले तर आमची हरकत नाही. एकाच ठिकाणी, एकाच रस्त्यावर ही पथके एकत्र येतात. एकाचवेळी वादन सुरू होत असल्याने परिसरातील शांततेचा भंग होतो. आवाजाची मर्यादा पाळून हे कार्यक्रम झाले पाहिजेत, अशी भावना रहिवाशांनी व्यक्त केली. ढोलताशा पथकांचा गजर सुरू असतानाच त्याच्या दुसऱ्या बाजुला डीजेवर मोठ्या आवाजात गाणी लावली जातात. त्यामुळे फडके रस्ता भागात नक्की चालले काय याचा थांग लागत नसल्याची मते रहिवाशांनी व्यक्त केली. उत्सव काळात गर्दीमुळे दुकाने बंद ठेवावी लागतात. दुकाने बंद ठेवली नाहीतर पोलीस कारवाई करतात. सण, उत्सव काळात जोमाने खरेदी विक्री होते. याच काळात दुकाने बंद ठेवावी लागत असल्याने आर्थिक नुकसान सोसावे लागते, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. या सगळ्या शांतता भंगाविषयी काही व्यापारी, स्थानिक जागरूक रहिवासी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्याच्या दृष्टीने विचार करत आहेत.
00000