मुख्यमंत्र्यांनी माहीम विधानसभेसाठी सदा सरवणकरांचे मन वळवण्याचे प्रयत्न सोडले?
मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि महायुती एकमेकांना पुरक भूमिका घेणार, अशी चर्चा सुरु असतानाच राज ठाकरे यांच्या एका वक्तव्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज झाल्याची माहिती समोर आली आहे.
यामुळे माहीम विधानसभा मतदारसंघात अमित ठाकरे यांची वाट बिकट झाल्याचे बोलले जात आहे. माहीम विधानसभेत अमित ठाकरे यांच्यासमोर शिंदे गटाच्या सदा सरवणकर आणि ठाकरे गटाच्या महेश सावंत यांनी शड्डू ठोकला आहे. मात्र, महायुतीच्या नेत्यांनी सदा सरवणकर यांनी माहीममधून माघार घ्यावी, यासाठी प्रयत्न सुरु केले. भाजप नेत्यांच्या आग्रहामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील सदा सरवणकर यांची समजूत काढत होते. मात्र, राज ठाकरे यांनी ‘एबीपी माझा’च्या कार्यक्रमात केलेल्या एका वक्तव्यामुळे एकनाथ शिंदे हे दुखावले गेल्याचे सांगितले जाते.
राज ठाकरे यांनी बुधवारी एबीपीच्या ‘माझा व्हिजन, माझा महाराष्ट्र’ या कार्यक्रमात राज्यात पुढचा मुख्यमंत्री कोण होईल, या प्रश्नाचे उत्तर दिले होते. पुढचा मुख्यमंत्री भाजपचा होईल…. पण मनसेच्या साथीने, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. यावरुन राज ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती असल्याचा निष्कर्ष राजकीय वर्तुळात काढण्यात आला. या वक्तव्यामुळे आता एकनाथ शिंदे यांनी आता राज ठाकरे यांच्या विरोधात भूमिका घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकर यांच्या मनधरणीचे प्रयत्न थांबवल्याचे सांगितले जाते.
एकनाथ शिंदेंनी नेमकी काय भूमिका घेतली?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी रात्री सदा सरवणकर यांचा चर्चेसाठी वर्षा बंगल्यावर बोलावले होते. ही भेट सरवणकारांनी माहीममधून माघार घ्यावी, या मनधरणीसाठी असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता नव्याने समोर आलेल्या माहितीनुसार, सदा सरवणकर आणि मुख्यमंत्र्यांची सुमारे तासभर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी सदा सरवणकर यांना विचार विनिमयासाठी काही तास दिले होते. अशातच राज ठाकरेंनी पुढचा मुख्यमंत्री भाजपचा होईल या वक्तव्यानंतर मध्यस्थीतून एकनाथ शिंदेही एक पाऊल मागे आल्याची चर्चा आहे.
सदा सरवणकर यांच्या उमेदवारीचा निर्णय मी कार्यकर्त्यांच्या मनावर सोडला आहे, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतल्याचे समजते. माहीममध्ये सदा सरवणकर यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह, आनंद मोठा आहे. प्रत्येक पक्षाला कार्यकर्त्यांच्या भावना जपण्याची गरज असते, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. एकनाथ शिंदे यांनी माहीममधून माघार घ्यायची की नाही, याचा निर्णय सदा सरवणकर यांच्यावर सोडल्याने या मतदारसंघातील तिहेरी लढाई अटळ मानली जात आहे.