मुंबई : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. इच्छुक उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले आहेत. मंगळवार, 29 ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. सत्ताधारी आणि विरोधकांपैकी कोणकोणते उमेदवार उभे राहणार याची जेवढी उत्सुकता असते तेवढीच ती छोट्या पक्षांबाबतही असते.
अशातच गेल्या दोन निवडणुकांमध्ये ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाची देखील चांगलीच चर्चा होती. त्यामुळे यंदा देखील एमआयएम काय भूमिका घेणार, की विरोधी पक्ष – मविआ सोबत जाणार याची उत्सुकता होती.
मुस्लिम मते मिळावीत आणि अधिकाधिक राज्यात पक्षाचा विस्तार व्हावा, या उद्देशाने असदुद्दीन ओवेसी यांनी एमआयएम पक्ष हैदराबादमधून बाहेर काढून महाराष्ट्रात रुजवण्याचा प्रयत्न केला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पहिल्यांदा आपले उमेदवार उतरवले. या पहिल्याच प्रयत्नात ओवेसी यशस्वी झाले आणि महाराष्ट्रात त्यांनी दोन जागा जिंकल्या. एवढेच नाही तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी लोकसभेची देखील एक जागा जिंकली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत ओवैसी यांनी सर्वाधिक म्हणजे 44 उमेदवार उभे केले होते. त्यामुळे, यावेळी देखील ते जास्तीतजास्त उमेदवार उतरवतील, असा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्ष जागावाटप समोर आले तेव्हा अनेकांना धक्का बसला. कारण यावेळी ओवेसींनी अवघ्या 14 जागांवर उमेदवार दिले आहेत. आपला हात आखडता घेतला आहे.
विधानसभेच्या एकूण 288 जागांपैकी असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने केवळ 14 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. यात औरंगाबाद पूर्वमधून माजी खासदार इम्तियाज जलील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. औरंगाबाद मध्यमधून नासिर सिद्दीकी, धुळे शहरातून फारुख शाह अन्वर, मालेगाव मध्यमधून मुफ्ती इस्माईल कासमी, भिवंडी पश्चिममधून वारिस पठाण, भायखळामधून फैयाज अहमद खान, मुंब्रा कळव्यातून सैफ पठाण, वर्सोवा येथून रईस लष्करिया, सोलापूरमधून फारूख शाब्दी, मिरजमधून महेश कांबळे (SC), मूर्तिजापूरमधून सम्राट सुरवाडे (SC), कारंजा मानोरामधून मोहम्मद युसूफ, नांदेड दक्षिणमधून सय्यद मोईन आणि कुर्लामधून बबिता कानडे(SC) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
2019 च्या निवडणुकीत असदुद्दीन ओवेसी यांनी 44 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते, तर 2014 च्या निवडणुकीत 24 जागांवर निवडणूक लढवली होती. असे असतानाही यंदा त्यांनी आधीच्या दोन निवडणुकांच्या तुलनेत कमी उमेदवार दिले का दिले असावेत, या राजकीय गणिताचा अंदाज बांधला जात आहे. दरम्यान, एमआयएम हा प्रामाणिक पक्ष नव्हता; त्यांनी पळ काढला, असे सांगत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच एमआयएम सोबत न गेल्याचे कारण सांगितले होते. हे सांगतानाच अल्पसंख्याकापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला इतर पक्षांची आवश्यकता नसल्याचे देखील ते म्हणाले होते.
ओवेसींचे लक्ष दलित आणि मुस्लिम व्होट बँकांवर असल्याचे दिसते. ही राज्यातील महत्त्वाची व्होट बँक आहे. महाराष्ट्रात 13 टक्के दलित आणि 12 टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. ओवेसी यांच्या 14 उमेदवारांपैकी 11 मुस्लिम आणि तीन दलित उमेदवार उभे केले आहेत. आजवर अनेक राजकीय पक्षांनी या दोन समाजांच्या मदतीने सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न केला आहे.
संसदेत कायमच मुसलमान समाजाचे प्रश्न हिरीरीने मांडणाऱ्या असदुद्दीन ओवेसी यांच्या मुस्लिम राजकारणा काँग्रेस आणि सपा सारखे पक्ष नेहमी प्रश्न उपस्थित करतात. एवढेच नाही तर ओवेसींवर भाजपची बी-टीम असल्याची आरोपही अनेकदा करण्यात येतो. अनेक जागा लढवून ओवेसी शेवटी भाजपला विजयी करण्याचे काम करतात, असा आरोप त्यांच्याकडे सातत्याने होत असतो. यामुळेच, मुस्लिमांच्या मनात ओवेसींबद्दल संशय निर्माण झाला आहे. हाच संशय घालवण्यासाठी ठरावीक जागांवर लक्ष केंद्रित करून जास्तीत जास्त उमेदवार जिंकवण्याचा ओवेसींचा प्रयत्न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *