ठाणे : मतविभागणी टाळण्यासाठी, नाशिक पश्चिमची जागा भाजपच्या पदरात पडू नये, यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नाशिक (पश्चिम) मधील उमेदवार डॉ. डी. एल. कराड हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेत आहेत, अशी माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी दिली.
राज्यातील भाजपप्रणित महायुतीचे महाराष्ट्रद्रोही, गोरगरीब जनतेवर घोर अन्याय करणारे महायुतीचे सरकार पदच्युत करून त्याजागी पर्यायी सरकार स्थापन करणे हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे धोरण आहे. नाशिक (पश्चिम) विधानसभा मतदारसंघात मतविभागणी होऊन ती जागा भाजपच्या पदरात पडू नये, यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पक्षाचे उमेदवार डॉ. डी. एल. कराड हे आपला उमेदवारी अर्ज माघारी घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खा. संजय राऊत, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर आणि डॉ. डी. एल. कराड यांच्या सिल्व्हर ओक येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्याआधी डॉ. उदय नारकर, डॉ. डी. एल कराड, डॉ. विवेक माँटेरो, कॉ. शैलेंद्र कांबळे, कॉ. तानाजी जयभावे आणि कॉ. दिनेश सातभाई यांच्या शिष्टमंडळाने खा. संजय राऊत आणि शरद पवार यांच्यासोबत स्वतंत्र चर्चा केली.
