वाशी : नवी मुंबईत बेलापूर आणि ऐरोली हे दोन विधानसभा मतदारसंघ आहेत. या दोन्ही मतदारसंघांत नऊ लाख तीन हजार ८२८ मतदार आहेत. त्यापैकी ऐरोलीत सर्वाधिक म्हणजे चार लाख ८४ हजार २३५; तर बेलापूरमध्ये चार लाख १९ हजार ५९३ मतदार आहेत. ऐरोलीमध्ये बेलापूरपेक्षा जवळपास साठ हजार मतदार अधिक आहेत. ऐरोली क्षेत्रात महिला मतदारांची संख्यासुद्धा बेलापूरच्या तुलनेत अधिक आहे. ऐरोलीत दोन लाख १३ हजार ९००; तर बेलापुरात एक लाख ९६ हजार १२७ महिला मतदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात महिलांचा कौल महत्त्वाचा मानला जात आहे.
ऐरोली मतदारसंघात गाव, गावठाणे तसेच झोपडपट्ट्यांची मोठी वसाहत आहे. त्याचप्रमाणे एमआयडीसीचा विस्तीर्ण पट्टा आहे. त्यामुळे मतदार नोंदणीतसुद्धा हा मतदारसंघ आघाडीवर राहिला आहे. ऐरोली आणि बेलापूरमधील एकूण मतदारसंख्येपैकी पुरुष मतदारांची संख्या चार लाख ९३ हजार ८०१ इतकी आहे. पुरुष मतदारांचे हे प्रमाणसुद्धा बेलापूरच्या तुलनेत ऐरोलीमध्ये अधिक आहे. ऐरोलीत पुरुष मतदारांची संख्या दोन लाख ७० हजार ३३५ इतकी आहे; तर बेलापूरमध्ये दोन लाख २३ हजार ४६६ पुरुष मतदार आहेत.
लोकसभेतील सर्वाधिक मतदान बेलापुरात
लोकसभा निवडणुकीत ऐरोली विधानसभा मतदारसंघातील एकूण ४,५७,४५६ पैकी २,२१,७४० मतदारांनी मतदान केले होते. टक्केवारीत ते ४८.४७ इतके होते. बेलापूरमधील ३,९७,७३१ मतदारांपैकी २,०४,९६९ मतदारांनी मतदान केले होते. टक्केवारीत हे प्रमाण ५१.५३ इतके आहे. यावरून लोकसभेत सर्वाधिक मतदान बेलापूर मतदारसंघात झाले होते.
दोन्ही मतदारसंघांतील मतदार संख्या
१. ऐरोली
पुरुष – २,७०,३३५
महिला – २,१३,९००
एकूण – ४,८४,२३५
२. बेलापूर
पुरुष – २,२३,४६६
महिला – १,९६,१२७
एकूण – ४,१९,५९३
