लाडक्या बहि‍णींना महिना २१००, वृध्दांना महिना २१००, शेतकऱ्यांना वर्षाला १५००० – एकनाथ शिंदेंच्या बंपर घोषणा

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत आज कोल्हापूर येथून आई अंबाबाईच्या आशीर्वादाने प्रचाराचा नारळ फोडून महायुतीच्या महाविजयाचा संकल्प आणि प्रचाराचा शंखनाद करण्यात आला. राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीची संयुक्त सभा आज कोल्हापूरात झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी १० बंपर घोषणा करताना महिलांना दरमहा १५०० एवेजी २१००, वृद्धांना २१०० तर शेतकऱ्यांना वर्षाला १५००० रुपये मोफत देण्याची घोषणा केली.

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आजची सभा खूप ऐतिहासिक आहे, 1995 साली बाळासाहेब ठाकरे यांनी इथूनच प्रचाराचा शुभारंभ केला आणि इतिहास घडला. आई अंबाबाईने नेहमीच आम्हाला आशीर्वाद दिला आहे, आज देखील आई अंबाबाई आम्हाला आशीर्वाद देईल. यावेळी, २३ तारखेला विजयाचा गुलाल उधळायला इथं येऊ. तत्पूर्वी, वचननाम्यातील १० कलमं जनतेच्यासमोर ठेवतो आहे, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी वचननाम्यातील मोठी घोषणा सांगितली.

राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपचा जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध केला जाणार आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकाही मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलीय. विरोधक लाडक्या बहीण योजनेला विरोध म्हणून कोर्टात गेले, आता नागपूरचा कोणतरी कोर्टात गेला आहे. कोणाच्या माय का लाल आला तरी ही योजना बंद होणार नाही, तुमचे आशीर्वाद मिळाल्यानंतर तुम्हाला देताना आमचे हात आकडते घेणार नाही. आम्ही दिल्लीला जातो तर म्हणता दिल्लीला जातात, आम्ही निधी आणायला जातो. पण तुम्ही दिल्लीला जाता की माझा चेहरा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करा म्हणून. मात्र, तुमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना तुमचा चेहरा नको आहे, तर महाराष्ट्रातील जनता कशी स्वीकारेल, असा टोलाही उद्धव ठाकरेंना लगावला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वचननाम्यातील केलेल्या १० घोषणा

1) लाडक्या बहिणींना रु.२१०० प्रत्येक महिन्याला रु.१५०० वरुन रु.२१०० देण्याचे तसेच महिला सुरक्षेसाठी २५००० महिलांना पोलीस दलात समावेश करण्याचे वचन!

2) शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला रु.१५००० प्रत्येक वर्षाला रु.१२००० वरुन रु.१५००० देण्याचे तसेच MSP वर २०% अनुदान देण्याचे वचन!

3) प्रत्येकास अन्न आणि निवारा, तसेच प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्याचे वचन!

4) वृद्ध पेन्शन धारकांना रु.१५०० वरुन रु.२१०० देण्याचे वचन!

5) जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर राज्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवण्याचे वचन!

6) २५ लाख रोजगार निमिर्ती तसेच १० लाख विद्यार्थ्यांना रु.१०,००० प्रशिक्षणातून महिन्याला १० लाख विद्यार्थ्यांना रु.१०,००० विद्यावेतन देण्याचे वचन!

7) ४५,००० गावांत पाणंद रस्ते बांधणार  राज्यातील ग्रामीण भागात पांदण रस्ते बांधण्याचे वचन!

8) अंगणवाडी आणि आशा सेविकांना रु.१५,००० आणि सुरक्षा कवच महिन्याला रु.१५,००० वेतन आणि संरक्षण देण्याचे वचन!

9) वीज बिलात ३०% कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्याचे वचन!

10) सरकार स्थापनेनंतर ‘व्हिजन महाराष्ट्र@२०२९ येत्या शंभरदिवसांच्या आत सादर करण्याचे वचन!

बाळासाहेबांचे गहाण ठेवलेले धनुष्यबाण आम्ही सोडवले- शिंदे

सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंगळवारी कोरेगावात महायुतीचे उमेदवार आमदार महेश शिंदे यांच्या प्रचार सभेत बोलताना उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसकडे गहण ठेवलेले बाळासाहेब ठाकरेंचे धनुष्यबाण आम्ही सोडवले अशी टीका त्यांनी केली.

कोरोना काळात महेश शिंदेंनी केलेल्या कामाचा पाढा वाचताना ‘आमदार कसा असावा तर महेश शिंदेसारखा असावा’ असे त्यांनी म्हटले. कोरेगाव मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे आणि शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेश शिंदे यांच्यात लढत होत आहे.

“महेश माझ्या विश्वासातील बॅट्समन आहे, तो चौकार आणि षटकार मारुन सेंच्युरी मारल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे. त्याच्या प्रचाराला येण्याची गरज नव्हती. पण, मला तुमचा आशीर्वाद घ्यायचा असल्याने मी इथे आलोय. माझ्या जन्मभूमीत सभा होतायत याचा अभिमान वाटतो. कोरोना काळात महेश शिंदेने अप्रतिम काम केले. तो माझा सर्वात आवडता आमदार आहे. त्याला निवडून आणण्याची जबाबदारी तुमची आहे, त्यानंतर तुमच्या मनात असलेली इच्छा मी पूर्ण करेन”, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी महेश शिंदे यांना आगामी काळात मोठे पद देणार असल्याचे संकेत दिले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *