मुंबई : प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने लाडक्या बहीण योजनेत उडी घेत आता ३५०० रुपये महीना देण्याची घोषणा करीत आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.
या जाहिरनाम्यात आरक्षणाबाबत वंचित सुरक्षितता देईल, बोगस आदिवासी दाखले रद्द करू आणि हक्काच्या लोकांना त्याचे हक्क देऊ, अनुसूचित जाती-जमातीच्या उद्धारासाठी प्रयत्न करू. तर भटक्या विमुक्त समुदाय या संदर्भातील धोरण आणि जात जनगणना करून मंडल आयोगाची शंभर टक्के अंमलबजावणी करण्यात येईल. असे अनेक मुद्दे मांडत प्रकाश आंबेडकरांनी मतदारांना वंचितला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. जाहीरनाम्यामध्ये मोहम्मद पैगंबर बिल विधिमंडळात मंजूर करू, अशी मोठी घोषणा केली आहे. अल्पसंख्यांक समूहासाठी धोरण, महिला सक्षमीकरण धोरण, महिलांना ३५०० रुपये मासिक वेतनसह वर्षात तीन सिलेंडर मोफत देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. चाळीस वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना पाच हजार रुपये मासिक पेन्शन देऊ. नवीन उद्योगांना अनुदान देऊ. तर केजी टू पीजी शिक्षण मोफतसह शासकीय पद भरती विद्यार्थ्यांसाठी वर्षभरातील सर्व परीक्षा फक्त शंभर रुपयांमध्ये विद्यार्थी परीक्षक सुविधा उपलब्ध करून देऊ, असेही वंचितच्या जाहीरनाम्यात प्रसिद्ध करण्यात आले आहे.
प्रति महिना घरगुती वापराची 200 युनिट वीज मोफत आणि 300 युनिट वीज ज्येष्ठ नागरिकांना मोफत मिळणार. अंगणवाडी सेविकांना अशा कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी दर्जा देऊ. तर गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करू. बौद्ध अनुयायांना मोफत धम्म सहल घडवून देऊ. बेरोजगार पदविका आणि पदवीधर आणि पदवीउत्तर सुशिक्षित तरुण, तरुणांना दोन वर्ष पाच हजार रुपये वेटिंग भत्ता मिळणार असेही वंचितने आश्वासन दिले आहे.
