टच संस्थेच्या वतीने
राजेंद्र साळसकर
मुंबई : ‘टच'(टर्निंग अपॉर्चुनिटीज फॉर अपलिफ्टमेंट अँड चाईल्ड हेल्प) ही स्वयंसेवी संस्था १९९३- ९४ पासून ग्रामीण व शहरी भागातील मुलांच्या विकासासाठी महाराष्ट्रभर कार्यरत आहे. दुर्गम, डोंगराळ, आदिवासी तसेच शहरातील आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या मुलांना मदत करण्यासाठी आणि त्यांना समाजात आत्मविश्वासाचे व सन्मानाचे स्थान मिळवण्यासाठी ही संस्था मदत करते. आतापर्यंत जवळपास ४५०० मुलापर्यंत या संस्थेचे कार्य पोहोचले असून त्यांना त्यातून स्वबळावर उभे राहण्याचे स्फूर्ती मिळत आहे. या सर्व विद्यार्थ्यांसाठी टच ब्रीज स्कूलच्या माध्यमातून रस्त्यावरील बेघर मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मनोरंजक पद्धतीने औपचारिक शिक्षण दिले जाते.
सर्व सामान्यांप्रमाणे आपल्यालाही शिक्षण मिळाले पाहिजे अशी प्रत्येक बालकांची एक अपेक्षा असते, परंतु परिस्थितीच्या कारणाने काही मुले शिक्षणापासून वंचित राहतात अशा मुलांना कायमस्वरूपी शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी `टच बालग्राम´ हा निवासी प्रकल्प विहीगाव ,कसारा या ठिकाणी चालतो. या प्रकल्पाच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांचे उच्चमाध्यमिक पर्यंतचे शिक्षण चालू आहे, तर काही विद्यार्थी हे विविध नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. याच बरोबर बालग्रामच्या अंतर्गत आदिवासी जनकल्याणासाठी विविध प्रकल्प `टच´ने हाती घेतलेले आहेत, ज्यामध्ये महिला सक्षमीकरण, विद्यार्थ्यांसाठी, संगणक प्रशिक्षण, पुस्तकपेढी, ग्रामविकास, शैक्षणिक पालकत्व, बालविकास केंद्र, बालभवन केंद्र या सर्वांचा समावेश आहे.
आशासदन हा अठरा वर्षांपुढील अनाथ,बेघर मुलांसाठी चालणारा निवासी प्रकल्प गोराईमध्ये स्थित आहे. अशी माहिती श्रीमती सुनीता तिवारी यांनी यावेळी दिली.
समाजातील सुस्थितीतील मुले व शिक्षणापासून वंचित असलेली मुले एकाच व्यासपीठावर आणून दोघांचेही एकाच स्पर्धेत समायोजन करून एकमेकांप्रती आत्मियता वाढवणे. त्यामुळे समाजातील सुस्थितीतील मुलांच्या मनात गरजू मुलांबद्दल आत्मियता, कणव निर्माण व्हावी, तसेच अडचणीतील गरजू मुलांच्या मनात आपणही सर्व मुलांप्रमाणेच आहोत आपणही सर्व मुलांप्रमाणे स्पर्धा करू शकतो हा आत्मविश्वास त्या विद्यार्थ्यांच्या मनात जागवणे.
कलागुणांना प्रोत्साहन देण्याबरोबरच मुलांमध्ये बालवयापासूनच सामाजिक बांधीलकीची भावना रुजविण्याच्या दृष्टिकोनातूनच हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. अशाप्रकारे हा बालदिन त्यांच्यासाठी एक आगळीवेगळी आठवण व प्रेरणा ठरेल अशी माहिती डॉ. दाक्षायणी मेनन यांनी दिली.
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही १४ नोव्हेंबरला `क्रिएटिव्ह टच चित्रकला स्पर्धे´ चे आयोजन पोलिस परेड मैदान, पोलिस कॉलनी, नायगाव, दादर या ठिकाणी दुपारी २ ते ७ यावेळेत करण्यात आले आहे.
चित्रकला स्पर्धेसाठी इयत्ता ४ थी ते ६ वी, ७ वी ते ९ वी व १० वी ते १२ वी अशा तीन गटामध्ये विभागणी करण्यात आली आहे. दुपारी ३ ते ५ यावेळेत स्पर्धा होईल. त्यानंतर ६ ते ७ मुलांसाठी बालगीतांचा कार्यक्रम होतील. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण होईल. प्रत्येक गटानुसार प्रथम पारितोषिक रु.१०,०००, द्वितीय पारितोषिक रु.५,०००, तृतीय पारितोषिक रु.२,५००, उत्तेजनार्थ परितोषिक रु.१००० व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
तरी या स्पर्धेत सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन `टच´ चे सामाजिक कार्यकर्ते उमाकांत पांचाळ यांनी केले.
स्पर्धेची नोंदणी करण्यासाठी ९८१९४५३८७३ या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन केले आहे.
00000
